नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात हत्यांचे सत्र सुरू आहे. आज पहाटे एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खुन करण्यात आल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. गेल्या तीन दिवसातील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांसमोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
नासिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भल्या पहाटे एका युवकाचा नाशिक-पुणे रोडवरील पुर्णिमा बस स्टॉप जवळ खून झाल्याची घटना घडली आहे. मृत युवक हा पुणे येथील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. हत्या झालेल्या तरुणाचे नाव हरीश पाटील असे आहे. त्याच्या खिशात आधार कार्ड सापडले असून त्याद्वारे त्याची ओळख पटली आहे. लुटमारीच्या प्रकरणातून हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पोलिसांनी तातडीने पडताळणी केली आहे. त्यातून हे स्पष्ट होत आहे की, चार ते पाच जणांच्या टोळक्याने हरीश पाटील या युवकावर प्राणघातक हल्ला केला. दगडाने ठेचून ही हत्या करण्यात आल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, आचल मुदगल हे घटनास्थळी तपास करीत आहेत.
आयुक्तांची परीक्षा
नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्याच महिन्यात त्यांनी सूत्रे स्विकारली आहेत. त्यातच आता नाशकात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. दोन दिवसापूर्वी माडसांगवी येथे पतीने पत्नीचा लाकडी फावड्याने खुन केला. तर, म्हसरुळ परिसरात काल एका तरुणाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. तर, आज पहाटे आणखी एका खुनाची घटना समोर आली आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी आता आयुक्तांना कठोर पावले उचलावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.