इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोनापाठोपाठ आता भारतासाठी आणखी एक चिंताजनक बातमी आहे. भारतात मंकीपॉक्स आजाराने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. या आजाराचा एक रुग्ण केरळमध्ये आढळून आला आहे. त्यानंतर आता या आजाराचा आणखी एक रुग्ण बाधित असल्याचे समोर आले आहे. हा रुग्णही केरळमधलाच आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी ही माहिती दिली. यासोबतच आता देशात या विषाणूच्या संसर्गाची दोन प्रकरणे समोर आली आहेत. पहिला संक्रमित युनायटेड अरब अमिरातीतून आला होता, तर दुसऱ्या प्रकरणाचा प्रवास इतिहास अद्याप स्पष्ट झालेला नाही.
याबाबत माहिती देताना आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या की, या प्रकाराचा संक्रमित आढळलेला 31 वर्षीय व्यक्ती हा कन्नूरचा आहे आणि त्याच्यावर परियाराम मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णाची प्रकृती आता ठीक आहे. त्याच्या संपर्कात असलेल्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
जीनोमिक रचनेत शास्त्रज्ञांना मंकीपॉक्सचे जीनोम कोरोना विषाणूपेक्षा सात पट मोठे असल्याचे आढळले आहे. केरळमधील रहिवासी असलेल्या देशातील पहिल्या मांकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णाचे दक्षिण आफ्रिकन प्रकार आहे, जे इतर प्रकारांपेक्षा कमी परिणामकारक तर आहेच, पण त्याचे वैद्यकीय उपचारही सोपे आहेत.
या बाबत शास्त्रज्ञ म्हणाले, मंकीपॉक्स हा डीएनए व्हायरस आहे तर कोरोना हा आरएनए व्हायरस आहे. डीएनए व्हायरस त्यांचे स्वरूप वारंवार बदलत नाहीत. याच कारणामुळे मंकीपॉक्सचे अनेक प्रकार किंवा क्लेड्स फिरत नाहीत. मात्र भारताने काळजी घेण्याची गरज आहे. याबाबत दक्षता वाढवायला हवी. लक्षणे असलेल्या नागरिकांची चाचणी करावी आणि संक्रमित रुग्णांना वेगळे करावे.
देशातील मंकीपॉक्स बाधित रुग्ण आढळल्यानंतर केंद्राची उच्चस्तरीय समिती जिल्हावार परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केरळला पोहोचली. यादरम्यान टीमला कळले की, जे लोक संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आले होते ते निगेटिव्ह आढळले. तसेच सर्व विमानतळांवर पाळत ठेवण्यास सांगितले जात आहे.
दुसरीकडे, तामिळनाडूचे आरोग्य मंत्री मा सुब्रमण्यम यांनी सांगितले की, आम्ही केरळच्या सीमेवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या वरिष्ठ शास्त्रज्ञाने सांगितले की, पश्चिम आफ्रिकन प्रकाराला जोखीम श्रेणीत टाकण्यात आले आहे. भारतात आतापर्यंत फक्त दक्षिण आफ्रिकन प्रकाराची माहिती झाली आहे.
एनआयव्ही पुणेच्या टीमनुसार, त्याची जीनोमिक रचना कोरोनापेक्षा सात पट मोठी आहे. त्याचा सार्वजनिक आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही. मात्र युरोपीय देशांमध्ये चिंतेचा विषय बनलेल्या मंकीपॉक्स विषाणूने आता भारतात शिरकाव झाला आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यात देशातील पहिल्या मंकीपॉक्सच्या संसर्गाची माहिती झाली आहे.
विजयवाडा येथेही एका मुलामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आली आहेत. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील जीजीएच हॉस्पिटलचे अधीक्षक एन राव यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मंकीपॉक्सची लक्षणे असलेल्या मुलाला जीजीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा होती. सध्या मुलाच्या कुटुंबीयांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये नमुने तपासल्यानंतर भारतात या प्रकरणाची माहिती झाली. केरळसह देशातील इतर राज्यांमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या वर्षी जानेवारीपासून ५० हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे समोर आली आहेत. देशात संसर्गाचे प्रकरण समोर आल्यानंतर दिल्ली सरकारने एलएनजेपी रुग्णालयाला दुर्मिळ व्हायरल संसर्गाच्या व्यवस्थापनासाठी नोडल केंद्र बनवले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही सतर्क आहोत आणि या गंभीर संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र काळजी घ्यावी.
Again one Monkey pox patient found in India Serious Kerala Foreign Return