इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवुडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी यांच्या गालाची तुलना रस्त्याशी करण्याचा प्रकार काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी असेच वक्तव्य केल्यानंतर आता केंद्रीय पोलाद राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते वादात सापडले आहेत. मध्य प्रदेशमधील डिंडौरी जिल्ह्यातील नान डिंडौरी येथे भूमिपूजनसाठी जात होते. अमरपूर गावातून जात असताना त्यांना काही ग्रामस्थांनी पाण्याच्या समस्येची तक्रार केली. त्यावर अधिकाऱ्यांशी बोलताना ते म्हणाले, की अमपूर गावात हेमा मालिनी यांच्या गालासारख्या रस्त्याची निर्मिती केली, परंतु पाण्याची समस्या कायम आहे. मंत्री बोलत असतानाचा हा व्हिडिओ कोणीतरी बनवला आणि व्हायरल केला असून, त्यांच्याव सर्वत्र टीका होत आहे.
पाण्याची समस्या आणि रस्त्याशी संबंधित या प्रकरणात अभिनेत्री आणि मथुराच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांचे नाव घेतल्याने काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. हा महिलांचा अपमान असल्याची टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष विरेंद्र बिहारी शुक्ला यांनी केली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव सत्तेवर असताना त्यांचे विधान आजही नागरिकांना आठवत आहे. हेमा मालिनी यांच्या गालासारखे बिहारचे रस्ते चोपडे बनवणार असल्याचे ते म्हणाले होते. त्यादरम्यान विरोधकांनी बिहारच्या रस्त्यांची तुलना ओम पुरी यांच्या गालाशी केली होती.
गुलाबराव पाटलांचेही आक्षेपार्ह विधान
राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी सुद्धा असे आक्षेपार्ह विधान केले होते. ते म्हणाले होते, की माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे आहेत. या तुलनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी याबद्दल माफीही मागितली होती.