नाशिक – शहरात कोरोना प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस अनेक समस्या निर्माण होत आहेत. काही दिवसांपूर्वी द्वारका परिसरातील एका खासगी हॉस्पिलमधील ऑक्सिजनचा साठा संपला होता. आता तिडके कॉलनीतील आणखी एका खासगी हॉस्पिटलचा ऑक्सिजनसाठा संपुष्टात आला आहे. या हॉस्पिटलमध्ये ३५ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने या रुग्णांना अन्य हॉस्पिटलमध्ये स्थलांतरीत करण्यात यावे, असे हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णांच्या नातेवाईकांना कळविले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहरात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होईल आणि रुग्णांची गैरसोय होणार नाही, असे वारंवार सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याचा प्रश्न गंभीर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
दरम्यान, या घटनेची दखल घेत या हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवठा होणार की येथील रुग्ण अन्यत्र हलविले जाणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.