शांघाय – कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहान शहरातील प्रयोगशाळेत झाल्याचा दावा अमेरिका आणि ब्रिटेनच्या संशोधकांनी केल्यानंतर चीनमध्ये हा विषाणू पुन्हा शिरकाव करत असल्याचे स्पष्ट होत आहे. चीनच्या दक्षिण प्रांतातील ग्वांगदोंग शहरात कोरोनाचा संसर्ग झाल्याने नवे रुग्ण आढळले आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता या शहरात प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रांताची राजधानी ग्वांगझूच्या अनेक भागात लॉकडाउन लावण्यात आला आहे.
ग्वांगदोंग भागात कोरोनाचे एकूण २७ नवे रुग्ण आढळले आहेत. ही संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. रुग्णांपैकी २० स्थानिक आहेत, तर ७ बाहेरून आलेले लोक आहेत. रुग्ण आढळल्यानंतर येथे लोकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या भागात संसर्ग वेगाने पसरत आहे.
येथील बाजार, पाळणाघरे, मनोरंजन स्थळे बंद करण्यात आली आहेत. रेस्टॉरंट, शाळासुद्धा बंद करण्यात आल्या आहेत, असे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. येथील विमानसेवा, बस, रेल्वे किंवा खासगी वाहनांनी ग्वांगदोंगहून जाणार्या लोकांना सोमवारी रात्री दहा वाजेनंतर ७२ तासांचा चाचणी अहवाल दाखविणे अनिवार्य करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या नर्सिंग होममध्ये संसर्ग
ऑस्ट्रेलियात कोरोनाचा संसर्ग नर्सिंग होमपर्यंत फैलावला आहे, असे ऑस्ट्रेलियाच्या प्रशासनाचे म्हणणे आहे. व्हिक्टोरिया प्रांताची राजधानी मेलबोर्नमध्ये संसर्ग क्षेत्र आढळल्यानंतर येथे लॉकडाउन लावण्यात आला आहे. वृद्धाश्रमात संसर्ग पसरल्याने व्हिक्टोरिया सरकार चिंतीत झाले आहे.
व्हिएतनाममध्ये नव्याने निर्बंध
व्हिएतनाममध्ये कोरोनाविरोधात लढण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये ९० लाख लोकांचे परीक्षण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. देशात सोमवारपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत लोकांना अत्यावश्यक कामांसाठी घरातून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. दहापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.