मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राच्या राजकारणात सुमारे १५ ते २० दिवसांपासून सुरू असलेली प्रचंड उलथापालथ आता थोडीशी थंडावली आहे. शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी तब्बल ४० पेक्षा अधिक आमदारांचा गट स्थापन केला आहे. विशेष म्हणजे दिवसागणिक त्यांच्या गटामध्ये आमदार वाढत आहेत. बहुमत चाचणीच्या आदल्या रात्रीही संतोष बांगर या आमदाराने शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर, आता आणखी ३ ते ४ सेना आमदार फुटणार असल्याचे सांगितले जात आहे.
काही आमदार देखील आता सत्ताधारी शिंदे गटात जावे की मूळ शिवसेना पक्षातच राहावे, या संभ्रमात आहेत. यासंदर्भात गुपचूप व हलक्या आवाजात कुजबूज सुरू आहे. अद्याप याबाबत ठोस आणि प्रत्यक्ष अशा हालचाली दिसून येत नाहीत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आत्मविश्वास असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत आपण शंभर पेक्षा जास्त जागा निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर, शिवसेनेला लागलेली गळती थांबविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. त्यामुळेच त्यांन आता ठाण्याच्या शिवसेना भवनामध्ये जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे.
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, पक्षातील आमदारांवर अन्याय होत होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, अन्यायाविरुद्ध उठाव केला पाहिजे; मी तो केला. मी उठावासाठी निघालो तेव्हा मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोन सुरू झाले. म्हणाले कुठे चाललात? मी त्यांना सांगितले मला माहिती नाही. माझ्यासोबतच्या एकाही आमदाराने आपण कुठे जात आहोत, काय करणार आहोत हे मला विचारले नाही. सगळ्यांचा माझ्यावर विश्वास होता. शिवसेनेत माझे खच्चीकरण करण्यात आले. सुनील प्रभूंना ते माहिती आहे. मी सच्चा शिवसैनिक आहे, शिवसेना वाचविण्यासाठी लढून शहीद झालो तरी चालेल पण आता माघार नाही, असा निर्धार करून निघालो. सोबत असलेल्या आमदारांना एवढाच विश्वास दिला की, तुमचे नुकसान होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.
शिवसेनेत सध्या उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आमदार आहेत. त्यांच्याशिवाय सेने नेमलेले गटनेते अजय चौधरी, पक्षाचे विधीमंडळातील प्रतोद सुनील प्रभू हे आहेत. तर, अन्य आमदारांमध्ये नितीन देशमुख, राहुल पाटील, वैभव नाईक, सुनील राऊत, रवींद्र वायकर, भास्कर जाधव, संजय पोतनीस, दिलीप लांडे, प्रकाश फातेरपेकर, राजन साळवी आणि कैलास पाटील या आमदारांचा समावेश आहे. बहुमत चाचणीमध्ये शिंदे यांच्या विरोधात मतदान केल्याने शिंदे गटाचे प्रतोत भरत गोगावले यांनी उद्धव गटातील १४ आमदारांना निलंबनाची नोटीस बजावली आहे. निलंबनाच्या भीतीपोटीही काही आमदार शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील या १५ आमदारांपैकी नेमके कोणते आमदार फुटणार याबाबत साशंकता आहे. मात्र, शिंदे म्हणाले की, संतोष बांगर रात्री माझ्याकडे आले. आणखी तीन-चार जण यायला तयार आहेत, असे त्यांनी मला सांगितले. मी कोणालाही जबरदस्तीने किंवा बंदूक लावून आणलेले नाही. असेही शिंदे म्हणाले. त्यामुळे आता कोणते आमदार फुटणार याबाबत सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Again 3 to 4 Shivsena MLA interested to join Shinde Group