मनीष कुलकर्णी, मुंबई
भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या नेतृत्वात ४० हून अधिक कसोटी सामने जिंकणार्या कर्णधारांच्या यादीत विराट कोहलीने प्रवेश केला आहे. या यादीत यापूर्वी दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथ, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि स्टिव्ह वॉ हेच प्रवेश करू शकले आहेत. सेंच्युरियन कसोटीत भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेला ११३ धावांनी पराभूत केले. कर्णधार म्हणून विराटचा हा ४० वा विजय होता. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकूण ६७ कसोटी सामने खेळले आहेत.
दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथ कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली दक्षिण अफ्रिकेला ५३ सामन्यात विजय मिळवून दिला आहे. तर रिकी पाँटिंग दुसर्या क्रमांकावर आहे. रिकीने आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला ७७ पैकी ४८ सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह वॉ तिसर्या क्रमांकावर आहे. स्टिव्हने ५७ सामन्यात संघाचे नेतृत्व केले. यादरम्याने त्याला ४१ सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देता आला आहे.
विराट कोहली आता भारतीय संघाचा फक्त कसोटी सामन्यांचा कर्णधार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान विराटने टी-२० च्या संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु दक्षिण अफ्रिका दौर्यापूर्वी बीसीसीआयने त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही हटविले होते. मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी आता रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये जाऊन कसोटी मालिकेत वर्चस्व प्रस्थापित केले होते. आता सेंच्युरियन पार्कमध्ये दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून भारताने इतिहास रचला आहे.