मुंबई – अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांच्या विवाहाबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा झडत आहेत. विवाहाच्या स्थळापासून ते पोशाख, सुरक्षा आणि कोण पाहुणे हजेरी लावणार याबद्दल चर्चा सुरू होत्या. अखेर दोघेही रेशीमगाठीत बांधले गेले आहेत. विकी आणि कॅटरिना राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकले आहेत.
विकी आणि कॅटरिना विवाहानंतर मधुचंद्रासाठी (हनिमून) कुठे जातील, त्याच्या ठिकाणांचीही चर्चा सुरू झाली. अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार नवदांपत्य लग्नानंतर लगेच मालदीवला रवाना होऊ शकतात. परंतु विकी आणि कॅटरिना मधुचंद्रासाठी मालदीवला जाणार नाही असे समजते.
येथे जाणार दांपत्य
विकी आणि कॅटरिना आता परदेशात नव्हे, तर बरवाडा येथील सिक्स सेंसस फोर्ट या रिसॉर्टला मधुचंद्रासाठी जाणार असल्याचे कळतेय. ई टाइम्सच्या सूत्रांच्या हवाल्यानुसार विकी आणि कॅटरिना १२ डिसेंबरपर्यंत या आलिशान रिसॉर्टला जाणार आहेत. त्यानंतर ते मुंबईला रवाना होतील. कामाच्या बाबतीत दांपत्य कटिबद्ध असल्याने आधी चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण करणार आहे.
दोघांकडे मोठे चित्रपट
विकी आणि कॅटरिना यांच्याकडे सध्या अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. ते आधी आपले काम पूर्ण करणार आहेत. कॅटरिनाचा आता सलमान खानसोबत टायगर ३ हा चित्रपट येणार आहे. तसेच फोन भूत या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. गोविंदा नाम मेरा या चित्रपटात विकी कौशल दिसणार आहे. या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. सॅम मानेकशॉ या आगामी आत्मचरित्रपर चित्रपटाचेही चित्रीकरण बाकी आहे. त्याशिवाय दोघांकडे वेगवेगळे प्रोजेक्ट असून त्याचे काम बाकी आहे.
पार्टी आणि बरेच काही…
विकी आणि कॅटरिना यांच्या लग्नानंतर पूल साइड पार्टी होणार असल्याचे वृत्त आहे. त्या पार्टीत बॉलिवूडमधील मोठे तारे-तारका हजेरी लावणार आहेत. तसेच विकी आणि कॅटरिना मुंबईमध्ये स्वागत समारंभही आयोजित करण्याची शक्यता आहे.