इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – युक्रेनवरील लष्करी कारवाईमुळे रशिया हा जगातील सर्वाधिक निर्बंध लागलेला देश बनला आहे. न्यूयॉर्क स्थित निर्बंध मॉनिटरिंग साइटने सांगितले की, अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी २२ फेब्रुवारी रोजी रशियावर पहिल्यांदा निर्बंध लादले. त्यापूर्वी एक दिवस म्हणजेच २१ फेब्रुवारीला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनचे दोन बंडखोर प्रदेश डोनेस्तक आणि लुहान्स्क यांना स्वतंत्र प्रांत म्हणून घोषित केले होते.
२४ फेब्रुवारी रोजी रशियाने आपल्या लष्करी मोहिमेची घोषणा केली. त्यानंतर रशियावर आणखी शंभर निर्बंध जागतिक संघटनांनकडून लादण्यात आले. साइटने म्हटले आहे की २२ फेब्रुवारीपूर्वी रशियावर २७५४ निर्बंध होते आणि हल्ल्यानंतर आणखी २७७८ निर्बंध लादण्यात आले होते. एकत्रितपणे, एकूण ५५३२ निर्बंध लादण्यात आले. यापूर्वी इराणवर ३६१६ निर्बंध लादण्यात आले होते. आता रशियाने तर इराणलाही मागे टाकले आहे. साइटनुसार, ज्या देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत त्यात स्वित्झर्लंड (५६८), युरोपियन युनियन (५१८), कॅनडा (४५४), ऑस्ट्रेलिया (४१३), अमेरिका (२४३), यूके (३५) आणि जपान यांचा समावेश आहे.
युक्रेनवरील हल्ल्यावरून रशियाच्या अर्थव्यवस्थेवरची पकड घट्ट करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाच्या तेल आयातीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अनेकवेळा अमेरिका आणि पाश्चात्य देशांना रशियन आयातीत कपात करण्याची विनंती केली होती. त्यानुसार अमेरिका हे पाऊल उचलणार असल्याचे सांगितले जात आहे.
जपानने रशिया आणि बेलारूसमधील आणखी ३२ व्यक्तींची मालमत्ता गोठवली आहे. जपानने मंगळवारी चेचन प्रजासत्ताकचे प्रमुख रमझान कादिरोव, उप लष्करप्रमुख, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारचे प्रेस सचिव आणि राज्य संसदेचे उपाध्यक्ष यांच्यासह २० रशियन लोकांची मालमत्ता रोखून धरली आहे. बेलारूसच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष व्हिक्टर लुकाशेन्को यांच्यावरही याअंतर्गत बंदी घालण्यात आली आहे.