इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क –
वेदांता – फॉक्सकॉननंतर आता नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही महाराष्ट्राच्या हातून गेला आहे. हा प्रकल्प आता गुजरातला साकारण्यात येणार आहे. टाटा समूहाचा एअरबस हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबरमध्ये याची घोषणाही केली होती. मात्र, आता २२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरात राज्यातील बडोदा येथे उभारला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑक्टोबर रोजी त्याचे भूमिपूजन करणार आहेत. या घोषणेमुळे महाराष्ट्र आणि मुख्यतः विदर्भ विकासाच्या स्वप्नांना धक्का बसला आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी गुरुवारी यासंबंधी माहिती देताना सांगितले की, वायुसेनेसाठी सी-२९५ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनविण्याची जबाबदारी टाटा एअरबसला सोपविली आहे. कंपनी बडोदा येथील प्लांटमध्ये याची निर्मिती करणार आहे.
गडकरी यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षांना या प्रकल्पाविषयी पत्र लिहिले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना याच महिन्यात पत्र लिहिले होते. हा प्रकल्प नागपूर परिसरातील टाटा समूहाच्या विस्तारित योजनांसाठी उपयोगी ठरेल, असेही पत्रात नमूद केले होते. गडकरींनी टाटा समूहाशी असलेल्या संबंधांचा हवाला देत मिहानला टाटा समूहाचा विकास हब बनविण्याची विनंतीही केली होती.
या प्रकल्पाविषयी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे म्हणाले, “मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरित करण्यासाठीच भाजपने एकनाथ शिदेना मुख्यमंत्रीपदावर बसवले आहे. आता टाटा एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेला.” भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये म्हणाले, “२४ सप्टेंबर २०२१ रोजी करार झाला. त्यानंतर हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी एकही पत्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पाठविले नाही वा कोणता पाठपुरावा केला नाही.” व्हीडीआयए अध्यक्ष दुष्यंत देशपांडे याविषयी म्हणाले, “टाटा एअरबसच्या प्रमुखांनी स्किल डेव्हलपमेंट सेंटर नागपुरात सुरु करण्यास उत्सुकता दाखविली आहे. काय गेले याची चिंत सोडून आपल्याकडे जे आहे त्यावर अधिक विचार करण्याची गरज आहे.”
फडणवीसांनी केला आरोप
महाविकास आघाडी सरकारने काहीच केले नाही असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. टाटा एअरबसचा प्रकल्प मिहानमध्ये उभारण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला नव्हता. मात्र, आपण त्यासाठी बरेच प्रयत्न केले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पासाठी काहीच हालचाली केल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
असा असणार बडोद्यात साकारणारा प्रकल्प
– बडोद्यातील प्लांटमध्ये संपूर्णतः स्वदेशी एअरक्राफ्ट तयार होईल. विमानांचा पुरवठा २०२६ ते २०३१ पर्यंत केला जाईल. पहिली १६ विमाने २०२३ ते २०२५ दरम्यान येतील. २०२१ च्या सप्टेंबरमध्ये भारताने एअरबस डिफेन्स अॅण्ड स्पेससोबत सुमारे २१ हजार कोटी रुपयांच्या करारावर सही केली. एअरबस चार वर्षांत स्पेनमध्ये अंतिम असेंब्ली लाइनपासून पहिली १६ विमाने देईल. त्यानंतर ४० विमाने भारतात टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स (टीएएसएल) द्वारा निर्मित व असेंबल केले जातील.