नवी दिल्ली – कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी लसीकरण करणे सर्वात महत्त्वाचे आहे. लस घेतल्यानंतर सकारात्मक परिणाम दिसत आहेत. काहींना थोडे दुष्परिणामही दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर साधारण लोकांना ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि अशक्तपणा असे त्रास जाणवतात. परंतु सध्या काही लोकांना त्वचेचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. लस घेतल्यानंतर त्वचेवर सूज तर काही जणांना त्वचेवर चट्टे दिसून आले आहेत. दुष्परिणाम जाणवलेल्या अशा लोकांची संख्या खूपच कमी आहे. हे दुष्परिणाम लसीचेच आहे असे थेट मानण्यास तज्ज्ञ चाचरत आहेत.
खूपच कमी लोकांना त्वचेच्या समस्या पाहायला मिळत आहेत. लस घेतल्यानंतर काहींना लगेचच तर काहींना एका दोन आठवड्यानंतर त्वचेच्या समस्या दिसत आहेत. काहीही त्रास झाला तरी लोकांनी लसीकरण करून घेणे आवश्यकच आहे, असे तज्ज्ञ सांगतात. दिल्लीतील खासगी रुग्णालयातील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. निधी रस्तोगी सांगतात, लस घेतल्यानंतर कमी लोकांना त्वचेच्या समस्या दिसल्या आहेत. अशा रुग्णांना टॉपिकल स्टेरॉइड दिले जात आहेत. त्यानंतर त्रास होत नाही.
तर सतर्क राहा
आधीपासूनच कोणाला त्वचेचा आजार किंवा त्वचारोग असेल, तर त्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्वचेची अॅलर्जी किंवा त्वचेवर चट्टे येण्यासारखे आजार असल्यास आणि लस घेतल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल जाणवू लागल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून सल्ला घ्यावा. निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष करणे अधिक त्रासदायक ठरू शकते.
त्वचेचा त्रास का?
लसीचा डोस घेतल्यावर इम्युन सिस्टिम सक्रिय होते. विषाणूविरोधात लढण्यासाठी शरीर स्वतःला तयार करते. इम्युन सिस्टिम सक्रिय झाल्यावर आणि त्वचेवर सूज आल्यास लोकांच्या त्वचेवर चट्टे दिसतात. मुंबईतील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सोनाली कोहली सांगतात, लस घेतल्यानंतर दोन-तीन आठवड्यानंतर केस गळतीच्या समस्या घेऊन रुग्ण आले होते. परंतु ते सर्व काही दिवसात बरे झाले.