कानपूर – कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र शासन तसेच विविध राज्यातील सरकारांकडून लसीकरण मोहीम सुरू आहे. काही ठिकाणी लसीकरण योग्य प्रकारे सुरू असून काही गावांत मात्र याबाबत गोंधळ उडालेला दिसून येत आहे. लशींचा अपुरा पुरवठा, केवळ एकाच वेळेस लस मिळणे, एकाच व्यक्तीला एकाच दिवसात दोनदा लस देणे असे गैरप्रकार घडत आहे. उत्तर प्रदेशात तर एका ज्येष्ठ नागरिकाला लस दिल्यावर लगेच त्यांना चक्कर आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. परंतु हा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला? याचा शोध घेणे सुरू आहे.
उत्तर प्रदेशात महाराजगंज परिसरातील मितावा गावात राहणाऱ्या ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोविड लस घेतल्यानंतर एका तासात मृत्यू झाला. वास्तविक पत्नीलाही ही लस मिळाली होती पण ती मात्र पूर्णपणे निरोगी आहे. आरोग्य केंद्रात हा प्रकार पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. तर आरोग्य कर्मचारीही हैराण झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस केद्रांवर पोहोचले.
पोलिसांनी सांगितले की, या घटनेबाबत कुटुंबातील सदस्यांनी आतापर्यंत आरोग्य विभाग किंवा लशीकरणाबाबत कोणताही आरोप किंवा तत्कार केली नव्हती. महाराज गंज सार्वजनिक आरोग्य केंद्रापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मिटावा गावातील ६२ वर्षीय शेतकरी जगनाथराव हे सायकलवर बसून कोविड लस घेण्यासाठी पत्नी विमला देवी यांच्यासह केंद्रावर पोहोचले, तेथे काही काळ विश्रांती घेतल्यानंतर, या जोडप्याने कोविशील्डचा पहिला डोस घेतला.
लसीकरणानंतर विमला देवी ह्या पूर्णपणे निरोगी होत्या, पण जगनाथराव यांना चक्कर येऊ लागली. ही घटना लोकांना समजली, तेव्हा त्यांना डॉक्टरांना सांगितले, पण ते लवकर आले नाहीत, त्यानंतर एक तासात तो व्यक्ती मरण पावला. त्यांची पत्नी विमला धावत डॉक्टरकडे गेली आणि तिच्या पतीबद्दल माहिती दिली. तेव्हा डॉक्टर लगेच आले तोपर्यंत उशीर झाला होता. घटनास्थळी उपस्थित लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेतला. तपास अहवालानंतर या प्रकरणी मृत्यूचे खरे कारण कळेल. वास्तविक या केंद्रात शेकडो लोकांना लसीकरण करण्यात आले असून सर्व निरोगी आहेत, असे सांगण्यात येते.