नवी दिल्ली – कोरोना विषाणूविरोधी लढ्यासाठी लस आली असली तरी धोका तसूभरही कमी झाला नसल्याचे स्पष्ट होत आहे. लसीकरणानंतरही संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. काही देशांमध्ये चौथी तर काही देशांमध्ये पाचव्या लाटेने प्रारंभ केला आहे. त्यामुळेच जगभरात पुन्हा चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
युरोपमधील अनेक देशात कोरोना रुग्ण वाढीचा हा सलग सहावा आठवडा आहे. इतकेच नाही तर यातील 61 देशांमध्ये या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 42 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. जर्मनीतील कोरोना प्रकरणांनी सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मात्र वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात युरोपमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत केवळ 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर रशियातील परिस्थिती अजूनही अत्यंत वाईट आहे. जगातील इतर देशांची काय स्थिती आहे, हे जाणून घेऊ या…
जर्मनी
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, गुरुवारी जर्मनीमध्ये कोरोना संसर्गाची विक्रमी 50,196 प्रकरणे नोंदवली गेली, तर एका दिवसात 235 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह, जर्मनीमध्ये संक्रमितांची संख्या 48.9 लाखांवर पोहोचली आहे, तर महामारीमुळे 97,198 जणांचा मृत्यू झाला आहे.
चीन
चीनमध्येही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी बीजिंग शहरातील अधिकाऱ्यांनी सहा स्थानिक घटनांची नोंद झाल्यानंतर मेळावे आणि कार्यक्रमांवर बंदी घातली. बीजिंगमध्ये स्थानिक संसर्गाची 50 प्रकरणे समोर आली आहेत. ऑक्टोबरच्या मध्यापासून चीनमध्ये एक हजाराहून अधिक स्थानिक रूग्ण प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
फ्रान्स
फ्रान्स पाचव्या लाटेच्या जवळ आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, फ्रान्समध्ये संक्रमित लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. फ्रान्स महामारीच्या पाचव्या लाटेच्या जवळ आहे. तर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फ्रान्समधील महामारीची पाचवी लाट पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकते. फ्रान्समध्ये एका दिवसात कोरोना संसर्गाचे 11 हजार 883 रुग्ण आढळले आहेत.
रशिया
रशियातील परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही आहे. रशियामध्ये गेल्या 24 तासांत महामारीमुळे 1,237 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 40,759 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, रशियामध्ये बाधितांची संख्या 8,952,472 वर गेली आहे तर साथीच्या रोगामुळे मृतांची संख्या 251,691 वर गेली आहे.
ब्राझील
ब्राझीलमध्ये अजूनही परिस्थिती चांगली नाही. ब्राझीलमध्ये कोरोना संसर्गाची 12,273 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, तर महामारीमुळे 280 लोकांचा मृत्यू झाला. यामुळे, ब्राझीलमध्ये संक्रमितांची संख्या 21,909,298 वर पोहोचली आहे, तर महामारीमुळे मृतांची संख्या 610,036 झाली आहे.
बेल्जियम
बेल्जियमने अँटी-कोविड-19 लसीचा बूस्टर डोस देण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. हे ज्ञात आहे की बेल्जियममध्ये, आरोग्य कर्मचारी आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना आधीच बूस्टर डोस दिला जात आहे. नव्या आदेशानंतर आता तरुणांसाठीही बूस्टर लसीकरण मोहीम सुरू करण्याची तयारी सुरू आहे. बेल्जियम हा युरोपमधील सर्वाधिक लसीकरण दर असलेल्या देशांपैकी एक आहे. सध्या बेल्जियम महामारीची चौथी लाट थांबवण्याचा प्रयत्न करत आहे.