इंदूर (मध्य प्रदेश) – देशभरातील प्रत्येक नागरिकांना कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी आणि प्रतिबंधक उपाय म्हणून रोज दोन लस लस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तरी अद्याप अनेक नागरिक लसीपासून वंचित आहे. परंतु एका महिलेने येथे दोन वेगवेगळ्या अँटी-कोरोनाव्हायरस लशीचे एकूण चार डोस घेतल्यानंतरही एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
येथील देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका 44 वर्षीय महिलेला त्वरीत चाचणी दरम्यान संसर्ग झाल्याचे आढळून आले. यानंतर महिलेला एअर इंडियाच्या इंदूर-दुबई फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखण्यात आले. तसेच तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका कौरव म्हणाल्या की, इंदूर-दुबई साप्ताहिक फ्लाइटच्या प्रत्येक प्रवाशाची स्थानिक विमानतळावर रॅपिड आरटी-पीसीआर चाचणी केली जाते.
या निश्चित प्रक्रियेनुसार बुधवारी 89 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. दुबईची रहिवासी असलेली संक्रमित महिला 12 दिवसांपूर्वी जवळच्या महू शहरात तिच्या नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी भारतात आली होती. डॉ.कौरव म्हणाल्या की, या महिलेने जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान अनुक्रमे सिनोफार्म आणि फायझरच्या अँटी-कोविड लशींचे प्रत्येकी दोन डोस घेतले. स्थानिक विमानतळावर जलद आरटी-पीसीआर चाचणीत संसर्ग झालेल्या महिलेमध्ये सध्या साथीची लक्षणे दिसत नाहीत. मात्र चार दिवसांपूर्वी सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्याचे त्यांनी विमानतळावरील आरोग्य विभागाच्या पथकाला सांगितले. सध्या महिलेला मनोरमा राजे टीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.