विशेष प्रतिनिधी, चेन्नई
आपले काम आणि लोकप्रिय योजनांच्या आधारावर २०२० मध्ये दिल्लीची सत्ता पुन्हा काबिज करणार्या आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासारखे काम करण्याची पद्धत इतर राज्यांचे मुख्यमंत्रीसुद्धा आत्मसात करत आहेत. त्याच पद्धतीने तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी राज्यातील नागरिकांसाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. त्यापैकी एक मोठी घोषणा म्हणजे राज्यातील महिलांना राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे.
२०१९ मध्ये आम आदमी पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीसुद्धा दिल्लीतील महिलांसाठी ही योजना लागू केली होती. एम के स्टॅलिन यांनी केजरीवाल यांच्याकडून प्रेरणा घेऊन ही घोषणा केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या मोफत बस प्रवास योजनेचा डीएमकेने आपल्या जाहीरनाम्यात समावेश केला होता. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर एम के स्टॅलिन यांनी महिलांना मोफत प्रवासाच्या योजनेची घोषणा केली. या घोषणेनंतर शनिवारपासून सर्व महिलांना बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे.
तामिळनाडू सरकारने शिधापत्रिकाधारकांना ४ हजार रुपये रक्कम देण्याची घोषणाही केली आहे. अरविंद केजरीवाल सरकारने ७२ लाथ शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य पुरवठ्याची घोषणा केली होती. याच धर्तीवर एम के स्टॅलिन यांनी पहिल्या भागात दोन हजार रुपयांप्रमाणे ४, १५३.६९ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याच्या आदेशावर हस्ताक्षर केले आहेत. या अंतर्गत २,०७,६७,००० शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे.
स्टॅलिन यांच्या घोषणा
– कोविड रुग्णांना २००० रुपये देण्यात येणार.
– दूधाच्या दरात कपात करणार.
– राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये महिलांना मोफत प्रवास.