विशेष प्रतिनिधी, मुंबई
देशभरातून टीका आणि मोठी चर्चा झाल्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटने लसीचे दर कमी केल्यानंतर आता भारत बायोटेक कंपनीनेही लसीचे दर घटविले आहेत. भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस राज्य सरकारांना प्रति डोस ६०० रुपयांना देणार होती. या दरात कपात करुन आता ती प्रति डोस ४०० रुपयांना दिली जाणार आहे.
जानेवारीच्या मध्यापासून जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली होती. १ मे पासून १८ वर्षांवरील तरुणांना लस देण्याचे घोषित झाले आहे. या लसीकरणासाठी कंपन्यांनी वेगवेगळ्या किंमती जाहीर केल्या आहेत. सीरमची कोविशिल्ड लस ही राज्य सरकारला ४०० रुपये दराने प्रति डोस तर खासगी रूग्णालयात ६०० रुपयांना देईल, अशी घोषणा केली होती. तर, भारत बायोटेकने कोवॅक्सीनचा प्रति डोस खासगी रुग्णालयांना १२०० रुपये आणि राज्य सरकारांना ६०० रुपयांना देण्याचे जाहिर केले आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारला हा डोस १५० रुपयांना दिला जाणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यांच्या दरात फरक का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अखेर याची दखल घेत सिरमने राज्यांसाठीचा दर १०० रुपयांनी कमी केला आहे. तर, भारत बायोटेकने २०० रुपये कमी केले आहेत.