मुंबई – देशाच्या आर्थिक हितांसह नियमांचे पालन करण्यास काही बँका टाळाटाळ करतात. त्यामुळे रिझर्व बँकेला कारवाई करावी लागते. अशाच प्रकारे देशातील काही सरकारी व सहकारी क्षेत्रातील मोठ्या बँकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय रिझव्र्ह बँकेच्या (आरबीआय) कडक धोरणानंतरही काही बँकांकडून सातत्याने नियमांचे उल्लंघन केले जात आहे. याच कारणामुळे आरबीआयने अनेक बँकांवर दंडही ठोठावला आहे.
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI ) नंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आणखी एका सरकारी बँकेवर म्हणजेच युनियन बँक ऑफ इंडियाला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या काही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने व्यावसायिक बँकांद्वारे फसवणूक-वर्गीकरण आणि अहवाल देणे तसेच निर्देश 2016 आणि बँकांकडून तणावग्रस्त मालमत्तेच्या विक्रीवरील मार्गदर्शक तत्त्वे यांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.
यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने विविध मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल गेल्या आठवड्यात देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वर 1 कोटी रुपये आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला 1.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या बँकेने काही खात्यातील फसवणुकीची माहिती देण्यास विलंब केला. याप्रकरणी आरबीआयने तेव्हा एसबीआयला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
व्यावसायिक बँका आणि निवडक वित्तीय संस्थांद्वारे वर्गीकरण आणि अहवाल 2016 मधील निर्देशांचे पालन न केल्याबद्दल बँकेला हा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला 1.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, 1949 अंतर्गत आरबीआयला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा आर्थिक दंड लावण्यात आला आहे.