लखनऊ (उत्तर प्रदेश) – देशातील लोकशाही व्यवस्थेत समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा यासाठी कायदे, न्यायालयाची व्यवस्था निर्माण केलेली आहे. तरीही ग्रामीण भागात अजूनही खाप पंचायतीसारख्या न्यायनिवाडा करणार्या समांतर व्यवस्था आहेत. मुरादाबाद येथील एका पीडित महिलेला पंचायतीने न्याय दिला आहे.
पाच दिवसांपूर्वी सासऱ्यांनी अत्याचार करून पतीने तीनदा तलाख दिल्याचा आरोप मोरादाबादच्या एका गावातील पीडित महिलेने केला. त्यावर गावातील पंचायतीने निर्णय देऊन पीडितेला घर बांधण्यासाठी २२५ फूट जमीन आणि चार लाख रुपये रोख देण्याचे फर्मान सुनावले आहेत. त्यानंतर पंचायतीने पती-पत्नीचे वैवाहिक संबंध संपविण्याचेही आदेश दिले आहेत.
हयातनगर पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात राहणार्या पीडित विवाहितेने गुरुवारी पोलिसांना तक्रार दिली की, तिच्या सासर्यांनी सात जूनच्या रात्री अत्याचार केला होता. या घटनेची माहिती तिने पतीला दिल्यानंतर पतीन तीनदा तलाख दिला. सासरकडच्या लोकांनी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही महिलेने केला होता.
पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली. या प्रकरणाची माहिती पंचायतीला मिळाल्यावर आपसात वाद मिटविण्याचे प्रयत्न सुरू झाले. याचदरम्यान पंचायत बसली. त्यामध्ये पीडित विवाहितेला २२५ फूट जमीन आणि रोख चार लाख रुपये देण्याचा निर्णय देण्यात आला.
पंचायतीत दीड लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित अडीच लाख रुपय नंतर देण्याचे ठरविण्यात आले आहे. पंचायतीच्या आदेशानुसार आता पती-पत्नीचा कोणताच संबंध राहणार नाही. पोलिसांना आपसात वाद मिटविल्याचा करारनामा सुपूर्द करण्यात आला आहे. आता दोन्ही बाजूने वाद मिटला असून लिखित करार झाला आहे, अशी माहिती हयातनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमित कुमार यांनी दिली. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार चौकशी सुरू होती असेही त्यांनी सांगितले.