मोहाली, पंजाब (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – बलात्कार हा कोणत्याही महिलेच्या जीवनातील अत्यंत भयानक आणि प्रचंड वाईट घटना म्हणावी लागेल. कारण या घटनेमुळे महिलेचे केवळ शारीरिक आणि मानसिक नव्हे तर संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होते. अलिकडच्या काळात देशभरातील अनेक राज्यांमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि बलात्काराच्या घटनांमध्ये खूपच वाढ झाली आहे.
या संदर्भात कठोर कायदे असूनही बलात्कार करणारे नराधम हे समाजात मोकाटपणे वावरत असतात, त्यामुळे या संदर्भातील कायदे आणखीन कठोर करायला हवेत, असे म्हटले जाते. बलात्काराच्या घटना या अगदी सात वर्षाच्या मुलीपासून सत्तर वर्षाच्या वृद्ध महिलेवर कोणावरही घडत आहेत. विशेषतः लहान बालीकांवरील अत्याचार या अत्यंत अमानुष कृत्य आहे, अशाच प्रकारची घटना बिहारमध्ये घडली असून या बलात्काराच्या घटनेनंतर १० वर्षाच्या बालिकेने एका मुलाला जन्म दिला, मात्र हे प्रकरण ती पंजाब मध्ये पोहोचल्यावर उघडकीस आले.
पंजाबमधील मोहालीमध्ये १० वर्षीय बलात्कार पीडितेने मुलाला जन्म दिला आहे. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून सोहाना पोलिसांनी अज्ञात तरुणाविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. खरे तर हे प्रकरण बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील कोयलशूर भागाशी संबंधित आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी शून्य एफआयआर नोंदवून संबंधित बिहार पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत १० वर्षीय अल्पवयीन मुलीने सांगितले की, मार्च २०२१ मध्ये ती बिहारमध्ये होती आणि तिथल्या शेतात रोजंदारीवर काम करणाऱ्यांना ती अन्नपाणी पोहोचवत असे. यादरम्यान पीडित मुलीला एका तरुणाला भेटला व त्याने मुलीला त्याच्या गोड बोलण्यात अडकवले. दुसऱ्या दिवशी पीडित तरुणी पुन्हा रोजंदारीवर जेवण देण्यासाठी शेतात पोहोचली. त्याचवेळी या तरुणाने तिला निर्जनस्थळी नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. कुणाला याविषयी सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. या भीतीमुळे पीडितेने कुटुंबीयांना काहीही सांगितले नाही. मे महिन्यात हे कुटुंब पंजाबात मोहालीत येऊन राहू लागले.
त्यानंतर डिसेंबरमध्ये मुलीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीय तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. तेथे डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले. आता या अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिला आहे. दुसरीकडे, पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवला असून हे प्रकरण बिहारमधील संबंधित पोलिस ठाण्यात पाठवले आहे.