मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रात लाऊडस्पीकरवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ७२ टक्के मशिदींनी अजानच्या वेळी लाऊडस्पीकरचा आवाज कमी केला आहे. याशिवाय अनेक मशिदींनी सकाळच्या अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर बंद केला आहे. मुंबई पोलिसांनी नुकत्याच जाहीर केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिसांचे हे सर्वेक्षण अशा वेळी झाले आहे, जेव्हा ऑल इंडिया सुन्ना जमियातुल उलेमा संघटनेच्या मुंबई शाखेने मुंबई पोलिसांकडे लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी मागितली होती.
संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना पत्र लिहून याप्रकरणी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची विनंती केली आहे. ऑल इंडिया सुन्नी जमियातुल उलेमाचे राज्य युनिट अध्यक्ष मोईनुद्दीन अश्रफ यांनी सांगितले की, मुंबईतील मशिदी आधीच लाऊडस्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आहेत. पण मशिदीमध्ये लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी देण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांना निर्देश द्यावेत, अशी विनंती अश्रफ यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी २ एप्रिल रोजी याबाबत इशारा दिला होता. जर महाराष्ट्र सरकार ३ मे पर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर हटविण्यात अयशस्वी ठरले तर त्यांचे कार्यकर्ते नमाजाच्या वेळी मशिदीसमोरील मोठ्या स्पीकरवर हनुमान चालीसा म्हणतील. लाऊड स्पीकरच्या वादात नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे म्हणाले होते की, अजानच्या १५ मिनिटे आधी किंवा नंतर कोणताही पक्ष किंवा नेता लाऊडस्पीकरवर भजन वाजवण्याचा विचार करत असेल, तर त्याला पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांना ६ महिने तुरुंगवास भोगावा लागेल, असे ते म्हणाले होते.
लाऊडस्पीकरच्या वापराबाबत महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होते की, सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरच्या वापराबाबत पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त मिळून मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहेत, ती लवकरच जारी केली जातील. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि जो कोणी राज्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.