नवी दिल्ली – पंजाबनंतर आता राजस्थानमध्येही नेतृत्वबदलाबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते सचिन पायलट यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांची भेट घेतली. पंजाबमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवून दलित नेते चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्रिपदावर बसविण्यात आले. त्यामुळे पायलट यांच्या भेटीचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
सचिन पायलट यांनी गेल्या आठवड्यातही राहुल गांधी यांची भेट घेतली होती.
राहुल गांधी यांच्या दिल्ली येथील तुघलक रोड येथील निवासस्थानी पायलट यांनी भेट घेतली. या वेळी प्रियंका गांधी उपस्थित होत्या. पंजाबच्या घटनाक्रमानंतर काँग्रेसच्या गोटात राजस्थानबाबत चर्चा सुरू झाली आहे. पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात नेतृत्वावरून ओढाताण सुरू आहे. छत्तीसगडसुद्धा पुढील यादीत असून, तेथेही नेतृत्त्वबदलाबाबत चर्चा सुरू आहे.
राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत पायलट यांची काय चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार आणि पक्षसंघटनेत फेरबदलाबाबत चर्चा झाली आहे. राजस्थानमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार आणि राज्यातील मंडळे तसेच महापालिकांमध्ये लवकरच नियुक्ती करण्याची मागणी पायलट अनेक दिवसांपासून करत आहेत. काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते त्यांच्यासोबत काम करत आहेत. पक्षाने त्यांना त्यांचा हक्क दिला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.
राजस्थानात प्रदेशाध्यक्षपदावर पायलट यांच्या पुनरागमनाबाबतही चर्चा सुरू झाली आहे. गेहलोत यांना हटवून राजस्थानात नेतृत्वबदल करावा, अशी मागणी पायलट समर्थक करत आहेत. राजस्थान आणि छत्तीसगड काँग्रेसडमधील धुसफूस थांबविण्याची काँग्रेस नेतृत्वाची इच्छा आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याच्या कथित कराराचा हवाला देत छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंहदेव हे भूपेश बघेल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याची मागणी करत आहेत.
राज्यमंत्रिमंडळ विस्तार आणि संघटनेत फेरबदल करण्याची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. अशोक गेहलोत आजारी पडले नसते तर आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार केला असता. तसेच महामंडळे, महापालिका, जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांची रूपरेषाही तयार करण्यात आली आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अजय माकन यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते.