नवी दिल्ली – देशातील कोरोना संकटामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज असून त्या अभावी रुग्णांचे जीव संकटात सापडले आहेत. त्यातच ओडिशाहून आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील शासकीय रुग्णालयात १८ टन वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन जाणारा टँकर रात्री उशिरा बेपत्ता झाला. त्यामुळे तब्बल ४०० रुग्णांचे जीव संकटात सापडले. अनेक नाट्यय घडामोडी घडल्यानंतर रुग्णांना ऑक्सिजन प्राप्त झाला.
ऑक्सिजनचा टँकर वेळेवर रुग्णालयात पोहोचला नाही, तर ऑक्सिजनवरील ४०० रूग्णांना आपला जीव गमावावा लागेल, असे रूग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे पोलिसांनी परिसरात कसून चौकशी करूनही टँकरचा शोध लागला नाही. अखेर पहाटे विजयवाडा येथील मुख्य पोलिस अधिकारी बी. श्रीनिवासुलू यांनी प्रांतातील सर्व पोलिस अधिक्षकांना टँकरचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलिस पथकाने सर्व मार्गांची तपासणी सुरू केली असता मेडिकल ऑक्सिजनने भरलेला टँकर पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एका ढाब्यावर उभे होत.
पोलिस चौकशीत असे आढळले की, टँकर चालकाने वैद्यकीय ऑक्सिजनसाठी अनेक ट्रिप केल्याने थकव्यामुळे त्याने टँकर ढाब्यावर पार्क केला होता. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि टँकर वेळीच रुग्णालयात दाखल झाले. सकाळी टँकर आला नसता तर रुग्णालयात मोठी आपत्ती आली असती. पोलिसांनी सांगितले, यापुढे मेडिकल ऑक्सिजनसाठी जाणारे टँकर सोबत काही होमगार्डही असतील. याचा फायदा असा होईल की, पोलिस आणि प्रशासन त्यांच्याशी सतत संपर्कात राहतील आणि वेळेवर ऑक्सिजन पोचविण्यास मदत करतील. कारण असा विलंब कोणत्याही वेळी शेकडो रुग्णांचे जीवन धोक्यात आणू शकतो.
आंध्र प्रदेशने केंद्र सरकारकडे एक हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी केली आहे. त्याचबरोबर केंद्र त्यांना केवळ पाचशे मेट्रिक टन ऑक्सिजन देत आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारने ऑक्सिजनपुरवठा करण्यासाठी केंद्राकडून 69 क्रायोजेनिक टँकरची मागणी केली आहे. पण यात यश आले नाही. सक्रिय रुग्ण प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने परिस्थिती बिघडली आहे.