नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वे विभागाच्या आरआरबी, एनटीपीसी, ग्रुप डी परीक्षा 2022 बाबत अनेक उमेदवारांच्या विरोधानंतर रेल्वेने या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तसेच आंदोलक उमेदवारांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी रेल्वेने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती विरोधक विद्यार्थ्यांचे आक्षेप ऐकून घेतील आणि त्यावर विचार करून आपला अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर करणार आहे.
रेल्वे भरती मंडळाच्या (RRB), नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) परीक्षेच्या निकालाविरोधात उमेदवार गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत होते. रेल्वेने CBT च्या दोन टप्प्यात ग्रुप डी भरती करण्याचे जाहीर केल्यावर हा विरोध आणखी वाढला. या संदर्भात प्रवक्त्याने सांगितले की, रेल्वेने एक समिती देखील स्थापन केली असून ती समिती परीक्षेतील यशस्वी आणि अनुत्तीर्ण उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपांची तपासणी करेल.
या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंच्या तक्रारी आणि समस्या ऐकून घेतल्यानंतर समिती रेल्वे मंत्रालयाला अहवाल सादर करेल. या बाबत , रेल्वेने उमेदवारांना नोटीस जारी केली होती की, निदर्शना दरम्यान तोडफोड करण्यासह इतर बेकायदेशीर कामांमध्ये गुंतलेल्या तरुणांच्या भरतीवर कायमची बंदी घालण्यात येईल. बिहारमध्ये अनेक ठिकाणी आंदोलक उमेदवार रेल्वे ट्रॅकवर धरणे धरत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे.
काही संतप्त उमेदवारांनी आज देशव्यापी रेल रोको आंदोलनाची घोषणा केली होती. हे रेल रोको आंदोलन देशव्यापी व्हावे, यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांना संदेश देण्यात येत होता. या आंदोलनाच्या माध्यमातून उमेदवारांनी रेल्वे भरती परीक्षांचे वेळापत्रक जारी करणे यासह इतर मुद्द्यांवरून रेल्वे रस्ता रोखण्याचा निर्णय घेतला होता. तसेच परीक्षेचा निकाल जाहीर करण्याच्या पद्धतीबाबतही उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सोमवारी, उमेदवारांनी पाटण्यातील राजेंद्र नगर टर्मिनलवरही गोंधळ घातला आणि निकालात दुरुस्तीची मागणी केली.
रेल्वे भरती बोर्डाने एक नोटीस जारी केली करून अधिक अर्ज आल्याने सीबीटी दोन टप्प्यात घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या परीक्षेसाठी सुमारे एक कोटी १७ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. याद्वारे एक लाख ३० हजार पदे भरण्यात येणार आहेत. सदर परीक्षा २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.