लखनऊ (उत्तर प्रदेश) – ‘मिया बिबी राजी तो…’ असे म्हटले जाते. बरेली जिल्ह्यातील एका गावात याचाच
प्रत्यय आला. कोरोना काळात राज्य सरकारच्या आदेशानुसार केवळ १०० जण लग्नाला येऊ शकतात. मात्र यावरून दोन्ही कुटुंबात होणारा वादविवाद पाहिल्यानंतर वधू-वरांनी बँडशिवाय आणि वऱ्हाडी मंडळी शिवाय विवाह करण्याचा विचार केला. त्या दोघांनी एकमेकांचा हात धरला आणि थेट मशिदीत इमाम गाठले आणि निकाह केला. विशेष म्हणजे सामाजिक अंतर पाळत हा विवाहसोहळा १५ मिनिटात पूर्ण झाला.
दिलदिया येथील रहिवासी दिलदार खान यांची मुलगी कामदुल निशा हिचे लग्न बिधौलिया येथील रहिवासी खलीलचा मुलगा अमन रशीद याच्याशी ठरले. परंतु मुलाच्या बाजूकडील लोकांनी एक अट ठेवली होती की, आम्ही १०० हून अधिक लोकांना मिरवणुकीत आणणार. परंतु त्या रात्रीच कर्फ्यू सुरू झाला हे पाहून वधू -वराने निकाहचा सोहळा साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला.
मात्र दोघांच्या कुटुंबियांचे एकमत झाले नाही, तेव्हा अमन आणि राणी यांनी दरगाह अल हजरत येथील बीबीजी मशिदीत जाऊन निकाहचा विधी पार पाडला. निकाहनामावर साक्षीदारांनी देखील सही केल्या. मात्र लग्नानंतर मुला-मुलीची बाजूची काही मंडळी चिडली. त्यामुळे वातावरण बिघडू लागले, तेव्हा वधू मुलगी थेट मेरा हक फाउंडेशनचे अध्यक्ष फरहत नक्वी यांच्याकडे गेली. तेथील पोलिस ठाण्यात मुला-मुलीच्या वतीने तक्रार अर्ज देण्यात आला.
मेरा हक फाउंडेशनचे अध्यक्ष फरहत नकवी म्हणाले की, निकाह विधी केल्यानंतर मुला मुली हे माझ्याशी फोनवर बोलले होते. आता कुटुंबातील सदस्य यावर आक्षेप घेत असून ते चुकीचे आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस अधिकाऱ्यांना मुलीच्या वतीने लेखी कळविले जात आहे.