विशेष प्रतिनिधी, मुंबई
दैनंदिन जीवनात दुध ही अत्यावश्यक गरज बनली आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आबालवृद्धांच्या आहारात दुधाचा समावेश असतो. सकाळचा चहा असो की कॉफी यासाठी दूध आवश्यकच असते. देशभरात इंधनांच्या किंमती दिवसेंदिवस लक्षणीयरित्या वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. आता दुधाचे दरही वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील प्रमुख दूध उत्पादक आणि वितरण कंपनी असलेल्या अमूलने दुधाच्या किंमतीत आजपासून (१ जुलै) प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ केली आहे. सहाजिकच सर्वसामान्यांना महागाईच्या काळात आर्थिक फटका बसला आहे. आता अन्य कंपन्या आणि दूध उत्पादकही दुधाचे दर वाढविण्याच्या तयारीत आहेत.
आधीच कोरोना कालावधीत अनेक जीवनावश्यक वस्तू महागड्या झाल्या आहेत. त्यातच गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. सोधी म्हणाले की, उत्पादन खर्चात वाढ केल्यामुळे ही दरवाढ सांगितले की, दि. १ जुलैपासून अमूल दुधाचे दर सर्व ब्रँडमध्ये दोन रुपयांनी वाढविण्यात येणार आहेत. अन्नधान्याच्या वाढत्या महागाईमुळे दुधाच्या किंमती वाढविणे आवश्यक आहे.
याशिवाय पॅकेजिंगच्या किंमतीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली असून वाहतुकीच्या किंमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि उर्जेचा खर्च ३० टक्क्यांनी वाढला आहे, यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे, असेही सोधी म्हणाले. सहाजिकच दुधाच्या किंमतीतील या वाढीमुळे दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीही वाढतील. तसेच पनीर, लोणी, तूप, चीज, लस्सी, आईस्क्रीम आणि ताक याशिवाय चहा, कॉफी, मिठाई आणि चॉकलेटच्या किंमतीही वाढू शकतात.
किंमती वाढल्यामुळे अहमदाबाद मधील अमूल गोल्ड, ताझा, शक्ती या ब्रँड आणि गाय दुधाच्या अर्ध्या लिटरच्या पाउचची किंमत अनुक्रमे २९ ,२३,२६ आणि २४ रुपये होईल. अमूलने यापूर्वी २०१९ च्या शेवटच्या तिमाहीत किंमती वाढवल्या होत्या. अमूल ब्रँड नावाने दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करताना उत्पादन खर्चात वाढ केल्यामुळे ही दरवाढ सुमारे एक वर्ष आणि सात महिन्यांनंतर केली जात आहे. अमूल दुधाचे दर प्रति लिटर २ रुपयांनी वाढविण्यात आली आहेत. नवीन किंमती सोना, ताझा, शक्ती, टी-स्पेशल, तसेच गाय आणि म्हशींच्या दुधासारख्या सर्व अमूल दुधाच्या ब्रॅण्डवर लागू होतील. राज्यातील विविध शहरांमध्ये सध्या ६० ते ७० रुपये प्रति लिटर या दराने दूधाची विक्री होत आहे. दूध दरवाढीमुळे हे दर आता ७५ रुपयांच्या आसपास जाणार आहेत.