नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज दुपारी भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळातील तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यातच राजकीय हालचालींनाही वेग आल्याचे दिसून येत आहे. मोदी-पवार भेटीनंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत हे पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस असे महाआघाडीचे सरकार कार्यरत आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट व चर्चा झाली होती. त्यानंतर आता मोदी-पवार भेट झाली आहे. राज्यात यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता राऊत हे पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत असल्याने काही नवीन शिजते आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राऊत आणि पवार यांच्यात अर्ध्यातासाहून अधिक वेळ चर्चा झाली असून त्यानंतर हे दोघे नेते पवार यांच्या वाहनातून संसद भवनाकडे निघाले आहेत. आगामी पावसाळी संसद अधिवेशनासंदर्भात राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यासाठी राऊत आणि पवार हे एकाच गाडीतून निघाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मोदी-पवार भेटीनंतर झालेली राऊत-पवार भेट आणि दोघांचाही एकत्र प्रवास याबाबत सर्वत्र विविध चर्चा रंगत आहेत. यासंदर्भात शिवसेना किंवा राष्ट्रवादी यांच्याकडून अधिकृत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.