इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मिझोरमनंतर आता त्रिपुरामध्ये अफ्रिकन स्वाइन तापाचा कहर दिसून आला आहे. त्रिपुरातील सेपाहिजाला जिल्ह्यांतील पशु संशोधन विकास विभाग (एआरडीडी) तर्फे संचलित देवीपूर येथील सरकारी प्रजनन फार्मवर अफ्रिकन स्वाइन ताप (एएसएफ)चे प्रकरणे आढळली आहेत. विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर एएनआयला ही माहिती दिली आहे.
अगरतळा येथील रोग तपास केंद्राच्या तज्ज्ञांचे पथक फार्मवर पोहोचले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जलद प्रतिसाद पथकांची स्थापना केली आहे. पशुपालन विभागाच्या रोग तपास प्रयोगशाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की ७ एप्रिल रोजी तीन नमुने तपासणीसाठी ईशान्य विभागीय रोगनिदान प्रयोगशाळेत पाठविले होते. १३ एप्रिल रोजी आम्हाला मिळालेल्या शेवटच्या पीसीआर अहवालात सर्व नमुने पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते.
अधिकाऱ्यांनी सांगितले, की फार्ममध्ये आधीच या तापाच्या संसर्गाने प्रवेश केला आहे. त्यामुळे डुकरांनाही संसर्ग झाल्याची लक्षणे दिसून येत आहेत. भोपाळच्या राष्ट्रीय रोगनिदान संस्थेतून एक अहवाल येणे अद्याप बाकी आहे. या तापाशी दोन हात करण्यासाठी प्रत्येक समुहाच्या दहा नागरिकांचा गट तयार करून टास्क फोर्सची स्थापना केली आहे. पथकाचे नेतृत्व पशुवैद्यकीय अधिकारी करणार आहे. प्रत्येक पथकाचे अधिकारी नोडल अधिकाऱ्यांना अहवाल देणार आहेत. एआरडीडीच्या रोग तपास प्रयोगशाळेच्या प्रभारी डॉय मृणाल दत्ता आणि विशालगढचे एसडीएम यांचा नोडल अधिकाऱ्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात सामुहिकरित्या डुकरांना मारले जात असून, त्यांना दफन करण्यासाठी ८ बाय ८ फुटाच्या कबर खोदल्या जात आहेत. तसेच सर्व डुकरांचे संगोपन खासगी पद्धतीने केले जात आहे. सुरुवातीला फार्मच्या एका किलोमीटरच्या क्षेत्रातील डुकरांना मारले जाणार आहे, आजार पसरण्यापासून रोखण्यासाठी त्यांना दफन केले जाणार आहे. राज्यात विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतांमधील आसपासच्या परिसरात विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.