विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बंद झालेले उद्योग-धंदे, व्यवसाय लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पुन्हा सुरू झाले आहेत. आगामी सहा महिन्यात (जुलै-डिसेंबर) होणाऱ्या उलाढालीतून सकारात्मक परिणाम दिसू लागणार आहेत. फिच सॉल्यूशन या संशोधन करणाऱ्या कंपनीच्या अहवालानुसार, ग्राहकांचा खर्च २०२१ मध्ये ९.१ टक्के दराने वाढणार आहे. गेल्या वर्षी हा दर ९.३ टक्क्यांनी घसरला होता. या दरम्यान भारतीय ग्राहक ७३.३ लाख कोटी रुपये खर्च करू शकतात, असेही अहवालात नमूद आहे.
कंपनीने ग्राहक आउटलूक २०२१ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, गेल्यावर्षी मोठ्या घसरणीनंतर यावर्षी स्थानिक खर्चात सुधारणा होऊ शकते. यादरम्यान स्थानिक खर्चात ९.१ टक्क्यांच्या वृद्धीसह भारतीय ग्राहकांचा सकारात्मक दृष्टिकोन राहण्याचा अंदाज आहे. एकूण स्थानिक खर्च कोविडपूर्वीच्या स्तराहून (२०१९) कमी असेल. २०१९ मध्ये ग्राहकांनी ७४ लाख कोटी रुपये खर्च केले होते.
महागाईचा दबाव कायम
उद्योगधंदे, व्यवसाय रूळावर आल्याने या वर्षी कुटुंबांकडून खर्च करण्याची क्षमता कोरोनापूर्व स्तरावरावरून वाढून ४.१६ लाख कोटीपर्यंत पोहोचणार आहे. २०१९ मध्ये हा दर ४.०९ लाख कोटी होती. खर्चावर महागाईचा दबाव कायम राहणार आहे. यावर्षी महागाई दर सरासरी ५ टक्के राहण्याची शक्यता आहे.
कमी वेतनाने खर्चात बाधा
२०२१ मध्ये सरासरी बेरोजगारीचा दर एकूण श्रमबलाच्या ८ टक्के राहणार आहे. तो २०२३ पर्यंत कोरोनापूर्व स्तराहून खाली येण्याची चिन्हे आहेत. परिस्थितीत सुधारणा झाल्यावर कामे पूर्ववत होत आहेत. परंतु कोविडपूर्व स्तराहून कमी तास काम करत आहेत किंवा कमी वेतनाच्या नोकरी करत आहेत. त्यामुळे लोकांना खर्चायोग्य पगार मिळणार नाहीत.