बरेली (उत्तर प्रदेश) – गेल्या १५ दिवसांपूर्वी हैदराबादच्या प्राणी संग्रहालयातील बागेत बंदिस्त असलेल्या आठ सिंहांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर आता इटावा जंगल सफारीतील सिंह सुद्धा बाधित झाला आहे. या घटनेमुळे प्राण्यांमध्येही संसर्ग पसरल्याचे स्पष्ट होत आहे.
बरेलीच्या प्रयोगशाळेमध्ये काही सिंहांचीआरटी-पीसीआर चाचणी झाली. त्यामध्ये १२ सिंहांचा अहवाल निगेटिव्ह आले तर १ पॉझिटिव्ह आला आहे. तसेच, एकाचा तपास अहवाल अद्याप संशयास्पद आहे. येथे असलेल्या काही सिंहांची देखील चाचणी घेण्यात आली. हैदराबादमध्ये आठ सिंहाची लागण झाल्यानंतर त्यांचे सॅम्पल इटावा लायन सफारीहून बरेली येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले.
तर दुसरीकडे जयपूरच्या नाहरगड प्राणीशास्त्र उद्यानातून सिंहांचेही चार चाचणी नमुने तपासणीसाठी आयव्हीआरआयकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल शुक्रवारपर्यंत प्राप्त होण्याची शक्यता आहे. लवकरच कानपूर व प्राणीसंग्रहालयातील आणखी काही सिंह, वाघ व इतर वन्य प्राण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येतील.
सिंहामध्ये कोरोना संसर्ग झाल्यानंतर प्राणिसंग्रहालयात बंदी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूने आता मानवाबरोबरच प्राण्यांमध्ये शिरकाव केला आहे. मानवाच्या संपर्कामुळे आता कोरोना विषाणूने जंगलाच्या राजा म्हणजेच सिंहालाही संसर्ग करण्यास सुरवात केली आहे.