मादागास्कर – ‘दैव तारी त्याला कोण मारी’ अशी मराठीत एक म्हण आहे, याचा अर्थ दैव बलवत्तर असेल तर आपल्याला कोणीही ठार मारू शकत नाही, म्हणजे तसेच नशिबाच्या जोरावर तो माणूस मृत्यूलाही जिंकतो, असे म्हटले जाते. थोडा वेळ दैव किंवा नशिब या गोष्टी आपण बाजूला ठेवू. परंतु थोडा प्रयत्न केला तर माणसाचा जीव कोणत्याही मोठ्या संकटात वाचू शकतो. म्हणतात ना! ‘बुडत्याला काडीचा आधार!’
अशा प्रकारे एक घटना परदेशात घडली, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती वर मात करीत दोघा व्यक्तींनी आपला स्वतःचा जीव वाचवला. वास्तविक पाहता हवेत आकाशात असो की समुद्रात मनुष्य जेव्हा अंत्यंत अधांतरी आणि धोकादायक परिस्थितीत असतो. समुद्रात होडी, जहाज किंवा आगबोट याला काही अपघात झाला तर मृत्यू हा ठरलेलाच, परंतु त्यातही काही व्यक्ती सही सलामत बाहेर पडतात.
आफ्रिकन देश मादागास्करचे पोलीस मंत्री आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्याने असेच एका संकटात कमालीचे धाडस दाखवले आहे. नुकतेच हिंदी महासागरात त्यांचे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर दोघांनीही समुद्राच्या बर्फाळ पाण्यात 12 तास पोहून आपला जीव वाचवण्यात यश मिळवले. या देशाच्या ईशान्य किनारपट्टीवर प्रवासी जहाज बुडाल्यानंतर बचाव कार्यात गेलेले पोलीस मंत्री सर्ज गेल आणि चीफ वॉरंट ऑफिसर जिमी लैतसारा (वय 57) हे अपघातानंतर पोहत- पोहत अखेर म्हाम्बोच्या किनाऱ्यावर पोहोचले, यावेळी मादागास्कर संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये गेल म्हणाले की, देवाचे आभार मानतो की, मी वाचलो. कारण माझ्यावर मरणाची वेळ आली नव्हती. मला आता सर्दी ताप आहे पण मला फारशी दुखापत झालेली नाही.
गेल आणि त्याच्या साथीदारांच्या या धाडसानंतर त्यांचे देशभरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांचे हिरो म्हणून वर्णन केले आहे आणि त्यांना एक असाधारण अॅथलीट म्हटले आहे. दुर्घटनेमधील इतर दोन जणांचा शोध सुरू आहे, परंतु अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.