मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या महिनाभरापासून वातावरणातील बदलामुळे उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडतोय. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ जिथे कडक उन्हाळा असतो तिथे जवळपास दररोज पाऊस येतोय. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की असे वातावरण होत असते. पण आता बंगालच्या उपसागराला एक वादळ धडकणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.
उबदार आणि ओलसर हवेचे थंड हवेत रुपांतर होते तेव्हा ढगांचा गडगडाट सुरू होतो. ओलावा निर्माण होतो, ज्याला आपण पाण्याची वाफ तयार होणे म्हणतो. या प्रक्रियेतून वादळ निर्माण होतात. या प्रक्रियेला संक्षेपण असे म्हणतात. सध्या अश्याच प्रक्रियेमुळे जगभरातील वातावरणात बदल झालेला दिसत आहे. आता बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येण्याची शक्यता असून त्याला मोचा असे नाव देण्यात आले आहे. हे वादळ बांगलादेशच्या किनारपट्टीला ११ ते १५ मे या कालावधीत धडकण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
काही मॉडेल्सच्या डिप्रेशनचे पुढे चक्रीवादळात रुपांतर होत असल्याचे चित्र आहे. त्यापूर्वी ५ मेच्या सुमारात दक्षिण बंगालच्या उपसागरात या डिप्रेशनची निर्मिती होईल. त्यामुळे बंगालच्या उपसागरात ५ ते ११ मे या कालावधीत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, असे सांगत उपसागरातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. बांगलादेशच्या किनारपट्टीवर ११ ते १५ मे या कालावधीत ‘मोचा’ चक्रीवादळ धडकेल, असा अंदाज यूएस ग्लोबल फोरकास्ट सिस्टीमने दोन दिवसांपूर्वीच दिली होती.
भारतीय हवामान खात्यानुसार, ११ मे रोजी मध्यरात्रीनंतर म्यानमारच्या राखीव राज्य आणि बांगलादेशच्या चट्टोग्राम किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. १३ मेपर्यंत कधीही ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. या कालावधीत बांगलादेशच्या किनारपट्टीवर ताशी १५० ते १८० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असे हवामानतज्ज्ञांनी म्हटले आहे.
वादळाला महिलांची नावे
चक्रीवादळाच्या नावांसाठी दक्षिण आशियायी राष्ट्रांचा एक गट तयार करण्यात आला आहे. वादळांच्या नावांचे पर्याय येथून मागवण्यात येतात. या नावांची एक यादी तयार केली जाते. सध्या एवढी मोठी यादी तयार आहे की पुढची तीन वर्ष ही नावं पुरतील. दरम्यान, पूर्वी वादळांना महिलांची नावे दिली जायची. पण वादळं आक्रमक असतात त्यामुळे या नावांवर आक्षेप घेण्यात आला. आताही नावं ठरविताना काही निकष आहेत. त्यात लिंगभेदी, जातीय, धार्मिक, राजकीय व्यक्तीचे नाव किंवा ऐतिहासिक नाव यांचा वापर करता येत नाही.
After Hailstorm and Unseasonal Rainfall Cyclone in Bay of Bengal