मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे भाजप आणि मनसे यांच्यातील युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. राज यांच्या भेटीची छायाचित्रे दानवे यांनीच सोशल माध्यमात शेअर केली आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकीत भाजप आणि मनसे यांची युती राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच टार्गेट केले. मात्र, त्यांनी केंद्र सरकार किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कुठलीही टीका केली नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यास काही दिवस उलटत नाही तोच केंद्रीय मंत्री गडकरींनी राज ठाकरे यांची त्यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ येथे भेट घेतली. या भेटीला काही दिवस उलटल्यानंतर आता केंद्रीय मंत्री दानवे हे राज यांच्या भेटीस दाखल झाले. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाल्याचे दानवे यांनी सांगितले आहे. मात्र, त्यातील सर्व मुद्दे कोणते याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री @RajThackeray यांच्या बरोबर भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली. pic.twitter.com/zvaof4RHck
— Raosaheb Patil Danve (मोदी का परिवार) (@raosahebdanve) April 9, 2022