हैती – कोविड महामारी, राष्ट्राध्यक्षांच्या हत्येमुळे निर्माण झालेली अस्थिर राजकीय परिस्थिती आणि भयानक गरिबीमुळे हैराण झालेल्या देशाला भूकंपाचा धक्का बसल्यामुळे हैती कोलमडून पडले आहे. हैतीच्या समुद्रीकिनार्यावर सोमवारी आणि मंगळवारी चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. वादळापूर्वी मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहणे सुरू झाले आहे. आधी भूकंप आणि नंतर चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ हैतीमधील लोकांवर आली आहे.
कॅरेबियन देशांपैकी एक असलेल्या हैतीमध्ये रविवारी आलेल्या संहारक भूकंपात १२९७ लोक मृत्युमुखी पडले असून, २८०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रहिवासी भागातील इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान एरियल हेन्री नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करत आहे. माजी खासदार भाड्याने विमान घेऊन जखमींना लेस काएसपासून राजधानी पोर्ट-ओ-प्रिंसच्या रुग्णालयात दाखल करत आहेत.
बेटसमुहावरील या देशाचा ७.२ रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपनामुळे चेहरामोहराच बदलून गेला आहे. संपूर्ण देशात ठिकठिकाणी ढिगारे दिसत आहेत. वेगवेगळ्या भागातून लोकांच्या विव्हळण्याचा आवाज येत आहे. शेकडो लोक ढिगार्याखाली दबलेले आहेत. मदत आणि बचावकार्य करणारे दल लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. इमारती मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्याने लोक मोकळ्या मैदानात राहात आहेत.
भूकंप आला अन्…
भूकंपाचे केंद्रबिंदू राजधानी पोर्ट-ओ-प्रिंसपासून १२५ किलोमीटर दूर पश्चिमेत होते. भूकंपाचा जोरदार धक्का बसल्यानंतर जमीन हलल्याचा भास झाला. त्यामुळे इमारतींना पडलेल्या भेगा आणखी रुंदावल्या. जुन्या इमारती काही क्षणात कोसळल्या. भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या लेस काएसची वीजपुरवठा विस्कळित झाला. त्यामुळे मदत आणि बचावकार्यावर परिणाम होत आहे. ढिगार्याखाली अडकलेले लोक वार्यावर असून, स्वतःला आणि नातेवाईकांना बाहेर काढण्यासाठी याचना करत आहेत.