कोलकाता – पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा सण असलेला दुर्गापूजा साजरा झाल्यानंतर पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. राज्यात पुन्हा एकदा कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढूत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक भागात पुन्हा कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) बनवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी दिवाळीच्या सणात संपूर्ण देशातच खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
सणासुदीनंतर कोलकाता, जलपाईगुडी आणि हुगळीनंतर हावडा, उत्तर २४ परगणा येथेही कोरोनाचे रोजचे प्रमाण वाढले आहे. दुर्गापूजेला अवघे दहा दिवस झाले असताना कोरोनाचे रोजचे आकडे भयानक दिसत आहेत. पश्चिम बंगालमध्ये शनिवारी कोरोनाचे ९७४ नवीन रुग्ण आढळले, रविवारी हा आकडा ९८९ वर पोहोचला. मात्र, काही प्रमाणात दिलासा मिळाल्याने सोमवारी कोरोनाचे ८०५ नवीन रुग्ण आढळून आले.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यानंतर राज्यात कोरोनाचे प्रथमच इतके जास्त रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमागील कारण म्हणजे राज्यात नुकतीच पार पडलेली दुर्गापूजा असे सांगण्यात येते. दि. ११ ऑक्टोबर पासून दुर्गापूजेला सुरुवात झाली असली तरी, सणाची तयारी आणि खरेदीसाठी लोकांनी आधीच बाजारपेठेत गर्दी केली होती. आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवरून धडा घेत राज्य सरकारने अनेक भागांना कंटेनमेंट झोन करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दुर्गापूजेदरम्यान रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी उठवण्यात आली होती, ती आता पुन्हा एकदा प्रभावी झाली आहे. अधिकारी म्हणाले की उत्तर २४ परगणामध्ये ५६ कंटेनमेंट झोन आधीच घोषित करण्यात आले आहेत. हावडामध्ये असे १४ झोन तयार करण्यात आले आहेत. जलपाईगुडी आणि हुगळीत अशा क्षेत्रांची संख्या अनुक्रमे ९ आणि ७२ झोन आहे.
कोलकातामध्ये कोरोनाचे २७३ नवीन रुग्ण रविवारी आढळले. उत्तर २४ परगणा राज्यात कोविड-१९चे सर्वाधिक १४६ रुग्ण आढळले आहेत. तर हावडा येथे ८३ जण दाखल आहेत. दक्षिण २४ परगणामध्ये ७४ आणि हुगळीत ८९ रुग्ण दाखल झाले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान, पश्चिम बंगालमध्ये गेल्या वर्षी २२ ऑक्टोबर रोजी कोरोनाचे विक्रमी ४,१५७ नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली होती. मात्र, त्यावेळी दुर्गापूजा २२ऑक्टोबरलाच सुरू झाली होती. पण कोरोनाचे सर्वात भयावह रूप यंदा विधानसभा निवडणुकीनंतर पाहायला मिळाले. त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये दैनंदिन रुग्णांची संख्या २० हजारांच्या पुढे गेली होती.