नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनुकंपा तत्वावरील प्रस्ताव प्रलनबिततेप्रकारणी महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे संचालक डॉ. नरेश गीते यांनी महावितरणच्या राज्यातील सर्वच परिमंडळ प्रशासनाचे कान पिळल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने दिवंगत कर्मचारी वारस आणि त्यांच्या कुटुंबियांचा संवाद मेळावा घेत त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. महावितरणच्या नाशिकरोड येथील नाशिक परिमंडळ मुख्यालय असलेल्या विद्युतभवन येथेही गुरुवारी या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
महावितरणमध्ये सेवेत असतांना दुर्दैवी निधन झालेल्या दिवंगत कर्मचाऱ्याच्या वारसांना अनुकंपा तत्वावर महावितरणमध्ये सेवेत घेण्याचा नियम आहे. परंतु या नियमानुसार महावितरण प्रशासनाकडे दाखल प्रस्ताव मार्गी लागावेत यासाठी संबंधित दिवंगत कर्मचा-याच्या कुटुंबियांना महावितरण प्रशासनाकडे उंबरठे झिजवावे लागत होते. राज्यभरातून अनुकंपा तत्वाच्या प्रस्तावांचा आढावा डॉ. नरेश गीते यांनी घेतल्यावर त्रुटी पूर्ततेअभावी असे प्रस्ताव लाल फितीत अडकून पडल्याची बाब स्पष्ट झाली होती. शिवाय संबंधित कुटुंबियांकडून प्रस्ताव मार्गी लागत नसल्याच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत डॉ. नरेश गीते यांनी दिवंगत कर्मचा-यांच्या वारस आणि कुटुंबियांना नोकरीसाठी येणा-या अडचणी स्वतः पुढाकार घेवून सोडविण्याचे व आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश सर्व परिमंडळ मुख्य अभियंत्यांना दिले होते. त्यानंतर नाशिकरोड येथे संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. नाशिक परिमंडल अंतर्गत दिवंगत २८ कर्मचा-यांच्या वारसांना मासिक निर्वाह भत्ता प्रकरणे परिमंडळ स्तरावर निकाली काढण्यात आली. १५ पैकी २ वारसांची समस्या या मेळाव्यात महावितरण प्रशासनाने सोडविली. या संवाद मेळाव्यात उपस्थित महावितरण अधिका-यांनी दिवंगत कर्मचारी वारस आणि त्यांच्या कुटुंबियांना मार्गदर्शन केले आणि सहकार्याची हमी दिली.