इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आम आदमी पार्टी या पक्षाने दिल्ली राज्यात चांगले काम केल्याने त्यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाब राज्यात दणदणीत विजय मिळाला. या यशाचा देशभरात बोलबाला झाला असून आम आदमी पार्टीच्या नावलौकिक वाढला आहे. त्यामुळे आता पंजाब नंतर पुढील लक्ष हे हरियाणा असणार आहे, असे सांगण्यात येते.
आम आदमी पार्टीचे हरियाणा युनिट प्रभारी आणि राज्यसभा खासदार डॉ. सुशील गुप्ता यांनी सांगितले की, पंजाबमधील विजयानंतर आता हरियाणाची वेळ आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने ९२ जागा जिंकून सरकार स्थापन करण्यात यश मिळवले आहे. सुशील गुप्ता यांनी पुढे सांगितले की, पक्ष राज्यातील शहरी संस्था आणि पंचायत निवडणुका स्वतःच्या चिन्हावर लढणार आहे.
पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या प्रचंड बहुमताने उत्साहित गुप्ता यांनी राज्यातील भाजप-जेजेपीच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार निशाणा साधताना म्हटले की, हरयाणात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. हरियाणा गुन्हेगारीची राजधानी झाली आहे.
ते आणखी म्हणाले की, राज्यात रोजगाराचे कोणतेही साधन नाही आणि तरुण वर्ग नोकरीसाठी ठेच खात आहे. या कारणांमुळे भाजप-जेजेपी युती सरकारबद्दल सर्वांचा भ्रमनिरास झाला आहे. पंजाबच्या जनतेने आप ला मत देऊन एक प्रामाणिक सरकार निवडून दिले आहे आणि येणाऱ्या काळात हरियाणातील जनताही तेच करेल.