विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोनाची तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक असल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वीच आणखी एका संकटाने पालकांची चिंता वाढवली आहे. कारण कोरोना होऊन गेलेल्या बालकांना एका विशिष्ट्य आजाराने ग्रासले आहे. याला मल्टीसिस्टीम इन्फ्लेमेंट्री सिंड्रोम (एमआयएस) असे म्हटले जात असून याच्या लक्षणांवर पालकांनी विशेष नजर ठेवण्याची गरज आहे.
या आजारात मुलांना ताप येणे, शरीरावर लाल डाग येणे, डोळे येणे, श्वास भरून येणे आदी लक्षणे दिसतात. यात उलट्या, डायरिया, थकवा यांचाही समावेश असू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने ही आपात्कालीन परिस्थिती असून वेळेत उपचार केल्यास फार चिंता करण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. तरीही या आजारावरील उपचारासाठी दिशानिर्देश तयार केले जात आहेत.
तज्ज्ञांनी तर याला कोरोनाचीच लक्षणे म्हटले आहे, पण आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह येत असल्यामुळे ती शंका दूर झालेली आहे. कोरोनामध्ये केवळ फुप्फुसांवर परिणाम होतो, पण या आजारात संपूर्ण शरीरावर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळेच त्याला मल्टीसिस्टीम इन्फ्लेमेंट्री सिंड्रोम म्हटले जाते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी हे संकट चिंता वाढविणारे ठरत आहे.
चिंतेचे कारण नाही
निती आयोगाच्या सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुलांमध्ये कोरोनाचे संक्रमण दोन प्रकारे बघायला मिळत आहे. एक म्हणजे कोरोनाचे संक्रमण झाले आणि घरात किंवा रुग्णालयात उपचारानंतर ते बरे झाले. संक्रमणानंतर केवळ २ ते ३ टक्के मुलांनाच रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली आहे. मात्र आमची तयारी यापेक्षा दुप्पट क्षमतेची आहे. केंद्र सरकार मुलांमध्ये होणाऱ्या संक्रमणावर विशेष लक्ष ठेवून आहे. त्याच्या उपचाराची दिशा ठरविण्यासाठी बालरोगतज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. ही समिती लवकरच आपला अहवालही देईल.’
…तरच धोका
मुलांमधील संक्रमणात बहुतांश प्रकरणी लक्षणे बघायला मिळत नाहीत. त्यामुळे विषाणूने म्युटंट बदलला असेल तर परिस्थितीही बदलू शकते आणि ते जास्त धोकादायक ठरू शकते. केंद्र सरकार नव्या पद्धतिने या संकटाचा सामना करण्याची तयारी करीत आहे, असेही डॉ. पॉल म्हणाल्या.