विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
एखादी कठीण गोष्ट मिळवण्यासाठी किंवा सिद्ध करण्यासाठी मनात जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही, असे म्हणतात. दिल्लीमधील एका विद्यार्थ्याने हे सिद्ध करून दाखविले आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्लीचे माजी विद्यार्थी नीरज चौधरी हिमालयातील नव्हे तर जगातील सर्वोच्च असलेले एव्हरेस्टवर शिखर सर करण्याची तयारी करत होते. त्याचदिवशी त्यांचा कोरोना अहवाल पॉझेटिव्ह आला. त्यांना कोरोना संसर्ग झाल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यानंतर कोरोना मुक्त होताच अवघ्या सात आठवड्यात ते पुन्हा एव्हरेस्टच्या बेस कॅम्पमध्ये आले आणि शेवटी त्यांनी जगातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा ध्वज फडकविला.
गिर्यारोहक नीरज चौधरी यांनी याबाबत आनंद व्यक्त करताना सांगितले की, मी खूप विचार करत होतो की तिथे जाण्याचा किती प्रयत्न केला आणि मला जाण्याची एकमेव संधी होती. या गोष्टीमुळे मला लवकरच माझे शरीर तंदुरुस्त तयार करण्याची प्रेरणा मिळाली. पण त्यापुर्वी मी एप्रिलमध्ये काठमांडूला परतलो आणि आता संसर्ग झाल्यावरही मन मात्र एव्हरेस्टवर फिरत होते. संसर्ग असूनही, मी कोरोनाबद्दल विचार करत नव्हतो. अखेर जिद्दीने 31 मे रोजी मी एव्हरेस्ट शिखरावर गेलो.
चौधरी यांनी 2009-11 च्या दरम्यान आयआयटी दिल्ली येथून पर्यावरण विज्ञान व व्यवस्थापन विषयातील एमटेक पदवी घेतली असून सध्या ते राजस्थान सरकारच्या जलसंपदा विभागात कार्यरत आहेत. त्यांनी 2014 मध्ये पर्वतारोहण सुरू केले आणि 2020 मध्ये ते युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत ‘इंडियन माउंटनीयरिंग फाऊंडेशन एव्हरेस्ट मोहिमे’चे सदस्य म्हणून निवडले गेले.