इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोना महामारीच्या लाटांवर लाटा येत असताना जगभरातील नागरिक धास्तावलेले आहेत. कोरोनाच्या लाटेतून सुटका होत नाही तोच, आता एका नव्या आजाराने तोंड वर काढले आहे. नायजेरियामध्ये वेगाने पाय पसरत असलेल्या लासा तापामुळे जगासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
नायजेरिया सेंटर फॉर डिसिज कंट्रोल (एनसीडीसी) च्या माहितीनुसार, नायजेरियामध्ये या वर्षातील ८८ दिवसांमध्ये लासा तापामुळे १२३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नायजेरियात सध्या ६५९ नागरिकांना लासा तापाची बाधा झाली आहे. ब्रिटनमध्ये या आजाराचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. लासा तापासून बरे झालेल्या २५ टक्के रुग्णांमध्ये बहिरेपणा आढळत आहे. यापैकी निम्म्या रुग्णांची एक ते तीन महिन्यांत ऐकण्याची क्षमता परतली आहे.
काय आहे लासा
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, लासा हा एक्युट व्हायरल हॅमोरेजिक ताप असतो. लासा विषाणूची बाधा झाल्यानंतर रुग्णांना ताप येतो. विषाणूंच्या कुटुंबातील एक असलेल्या एरिना विषाणूशी लासाचा संबंध आहे. अफ्रिकी मल्टिमॅमेट उंदरापासून या विषाणूची माणसाला लागण होते. उंदराचे मूत्र आणि घाणीमुळे घरातील खाद्यपदार्थ संक्रमित होतात, त्यामुळे हा आजार फैलावतो.
नायजेरियामध्ये प्रकोप
– २१ ते ३० वर्षांचे तरुण सर्वाधिक बाधित
– ४५ आरोग्य कर्मचारी या वर्षी आजाराने बाधित
– ३६ पैकी २३ राज्यांमध्ये संसर्गाची पुष्टी
– जानेवारी ते मार्चदरम्यान १८.७ टक्के मृत्यूदर
लक्षणेच नाहीत
डबल्यूएचओच्या माहितीनुसार, लासा विषाणूची बाधा झालेल्या ८० टक्के रुग्णांमध्ये संसर्गाचे कोणतेही लक्षण दिसले नाहीत. पाचपैकी एक रुग्णाला गंभीर त्रास होत आहे. या विषाणूमुळे शरीरातील यकृत, प्लिहा (स्प्लीन) आणि मुत्रपिंडावर गंभीर परिणाम होतात. अवयव निकामी होणे हेच सर्वाधिक बाधित रुग्णांच्या मृत्यूचे कारण आहे.
२१ दिवस राहतो परिणाम
माणसावर लासा तापाचा प्रभाव दोन ते २१ दिवसांपर्यंत राहतो. अमेरिकी आरोग्य संस्था सीडीसीच्या माहितीनुसार, १९६९ साली नायजेरियाच्या लासा शहरात या आजाराचा जन्म झाला होता. त्यानंतर आजाराचे नाव लासा ठेवण्यात आले होते. दरवर्षी सरासरी एक ते तीन लाख रुग्ण आढळतात आणि पाच हजार रुग्णांचा मृत्यू होतो. बेनिन, घाना, माली, सियारा लियोन, नायजेरियामध्ये आजाराचा प्रकोप सर्वाधिक आहे.
ही आहेत लक्षणे
लासा विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तीला ताप, डोकेदुखी, घसादुखी, मांसपेशी दुखणे, छातीत दुखणे, डायरिया, खोकला, पोटदुखी, मळमळ होणे अशी लक्षणे दिसून येतात. गंभीर रुग्णांच्या चेहऱ्यावर सूज, फुफ्फुसांमध्ये पाणी होणे, नाकातून रक्त निघणे, रक्तदाब वेगाने खाली घसरणे अशी लक्षणे दिसतात.