नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहे. भारतात कोरोनाच्या दोन भयानक लाटा येऊन आता तिसरी लाट दार ठोठावत आहे. तर जगातील अनेक देशांमध्ये चौथी लाट सुरू आहे. कोरोनाशी दोन हात करता करता नाकीनऊ आलेले असताना आता आणखी एका आजाराचा शिरकाव झाला आहे, त्याचे नाव आहे फ्लोरोना.
या देशात पहिला रुग्ण
अरब न्यूजच्या वृत्तानुसार, फ्लोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. कोविड -१९ आणि इन्फ्लूएंझा अशा दोन आजारांचे संक्रमण म्हणजे फ्लोरोना होय. दरम्यान, इस्रायलच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने सांगितले, की कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीचा चौथा डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
किती गंभीर आजार
या आजाराचा खुलासा Yediot Ahronot या इस्रायली वृत्तपत्राने केला आहे. वृत्तपत्राच्या माहितीनुसार, या आठवड्यात रॅबिन वैद्यकीय केंद्रात दाखल केलेल्या गर्भवतीला या आजाराचा संसर्ग झाला आहे. या आजारासंदर्भात आरोग्य तज्ज्ञांकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले नाही. आजाराचा खुलासा वृत्तपत्रातून झाल्यामुळे दोन्ही विषाणूंचे संयोजन किती गंभीर असू शकते याबद्दल स्पष्टता आलेली नाही. इस्त्रायलमध्ये एकमेव रुग्ण आढळला असला तरी तपासण्या न झाल्याने इतर रुग्णांच्या शरीरात फ्लोरोना असू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
चौथा बूस्टर डोस
टाइम्स ऑफ इस्त्रायलच्या माहितीनुसार, आरोग्य मंत्रालयाचे महासंचालक नचमन ऐश यांनी ओमिक्रॉनच्या लाटेमुळे कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या नागरिकांना बूस्टर डोस देण्याची परवानगी दिली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन बूस्टर डोस देणारा इस्त्रायल हा जगातील देशांपैकी एकमेव देश आहे.