बीजिंग – घातक कोरोना-१९ विषाणू चीनमधूनच आल्याचा दाट संशय सगळ्याच देशांना आहे. अमेरिकेसह ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी कोरोनासंदर्भात संशोधन करून तो चीनमधूनच आल्याचा दावा केला आहे. परंतु नेहमीप्रमाणे कावेबाज चीनने हा आरोप फेटाळून लावला आहे. अजून कोरोनातूनच आपण पूर्णपणे मुक्त झालेलो नसताना चीनमध्ये आता एंथ्रेक्स निमोनियाचा रुग्ण आढळला आहे.
उत्तर चीनच्या हेबई प्रांतात चेंगदे शहरात एंथ्रेक्स निमोनियाचा एक रुग्ण आढळला आहे. संबंधित व्यक्ती आधी पाळीव जनावरे, मेंढ्या आणि दूषित उत्पादनांच्या संपर्कात आला होता. बीजिंग रोग नियंत्रण केंद्राच्या माहितीने ग्लोबल टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार पीडित रुग्णामध्ये लक्षणे दिसल्यानंतर त्याला चार दिवसांपूर्वी बीजिंगमध्ये रुग्णवाहिकेने आणण्यात आले. विलगीकरणात ठेवून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
असा होऊ शकतो संसर्ग
बीजिंग सीडीसीच्या माहितीनुसार, जनावरे आणि मेंढ्यांच्या शरीरात एंथ्रेक्स असतो. आजारी जनावरे किंवा दूषित उत्पादनांच्या संपर्कात आल्यानंतर माणसालाही आजार होऊ शकतो. ९५ टक्के प्रकरणांमध्ये संपर्कात आल्यानंतर त्वचेला बाधा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. संबंधित व्यक्तीला फोड येऊन त्वचेचे विकार होऊ शकतात.
एंथ्रेक्सवर उपचार
एंथ्रेक्स निमोनिया सर्वाधिक घातक असतो. बॅसिलस एंथ्रेक्स (जंतू) माणसाच्या शरीरात श्वसनावाटे गेल्यानंतर हा आजार फैलावतो. एंथ्रेक्स माणसातून माणसामध्ये थेट जाऊ शकतो. परंतु तो फ्लू किंवा कोविड-१९ सारखा संसर्ग करत नाही. बॅसिलस एंथ्रेक्स जंतूंचा समूह असतो त्याच्यावर उपचारासाठी अनेक अँटिबायोटिक्स प्रभावी असतात.