नवी दिल्ली – राष्ट्रीय मेडिकल कौन्सिल आता विद्यार्थ्यांसाठी नवीन परीक्षा आणणार आहे. अंतिम वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी एक्झिट टेस्ट असणार आहे. 2023 पासून ही परीक्षा होणार असून पुढील वर्षी त्याची मॉक टेस्ट होणार आहे. विशेष म्हणजे, परदेशातून वैद्यकीय शाखेचे ज्ञान घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी ही परीक्षा पास करावी लागेल. याबरोबरच मेडिकलमधील पदव्युत्तर शिक्षणासाठी देखील याच परीक्षेचा आधार घेतला जाईल. आरोग्य मंत्री मानसुख मांडविय यांनी मेडिकल कौन्सिलच्या कामाचा आढावा घेतला. तसेच एक्झिट परीक्षेच्या तयारीची माहिती घेतली.
सगळ्यांसाठी बंधनकारक
आरोग्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षेला नॅशनल एक्झिट टेस्ट असे म्हटले असून, ती सगळ्यांसाठी बंधनकारक आहे. ही परीक्षा दिल्यानंतर एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर परीक्षा देण्याची गरज नाही.
एक्झिट टेस्टच त्यांच्यासाठी अंतिम वर्षाची परीक्षा मानली जाईल. या एक्झिट परिक्षेमुळे देशभरातील विद्यार्थ्यांना समान न्याय देणे सोपे जाईल, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच पदव्युत्तर शिक्षणासाठी देखील हीच परीक्षा आधारभूत मानली जाईल. यासाठी अन्य कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही. तसेच परदेशातून शिकून भारतात येणाऱ्यांसाठी होणारी स्वतंत्र परीक्षा रद्द करण्यात येईल. केंद्रीय आरोग्य सेवांमधील डॉक्टरांची नियुक्ती देखील याच परीक्षेच्या आधारावर होईल. सध्या या सगळ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा द्याव्या लागतात.
राष्ट्रीय मेडिकल कमिशन जेव्हा अस्तित्वात आले तेव्हाच आणि संसदेत जेव्हा कायदा झाला तेव्हाच या परीक्षेची तरतूद करण्यात आली होती. ही परीक्षा घेण्याआधी मॉक टेस्ट घेण्याची सूचना आरोग्य मंत्री मांडविय यांनी केली आहे. ज्यायोगे पहिल्यांदाच परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही.