नवी दिल्ली – सुमारे दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटाने ग्रासले आहे. अनेक देशात कोरोनाची लाट कमी होत असतानाच पुन्हा एकदा त्याचा धोका वाढला आहे. चीन आणि रशियामध्ये कोरोना संसर्गाने डोके वर काढले असताना आता युरोपातही तसाच प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोना प्रतिबंधक लस आल्यामुळे कोरोनाचा धोका कमी झाल्याची कुठलीही चिन्हे दिसत नसल्याचेही स्पष्ट होत आहे.
युरोपियन देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) याबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. कारण केवळ संसर्गच नव्हे तर मृत्यू पावलेल्या रूग्णांची प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. एकीकडे काही संशोधन तथा शास्त्रज्ञ लसीकरणानंतर जगभरात कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत, असे सांगत असताना दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने मात्र याबाबत चिंता व्यक्त केली आहे. युरोप हा जगातील एकमेव मोठा प्रदेश असून जिथे गेल्या आठवड्यात कोरोना विषाणूची प्रकरणे आणि मृत्यूची संख्या वाढली आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये हा आकडा दुहेरी अंकावर पोहोचला आहे.
युरोपीय प्रदेशातील 53 देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. तसेच, साप्ताहिक अहवालात नमूद केले आहे की, युरोपमध्ये या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण देखील 14 टक्क्यांनी वाढले आहे. येथे एकूण 1.6 दशलक्ष नवीन प्रकरणे आढळून आली आहेत आणि 21 हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. गेल्या सात दिवसांत येथे 5 हजार नवीन रुग्ण आढळून आल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. पूर्व युरोपमधील अनेक देशांनी रोमानिया आणि लॅटव्हियासह संक्रमणाच्या प्रसारावर बंदी घातली आहे. वाढत्या संक्रमणामुळे लॉकडाऊन लागू करणारा लॅटव्हिया हा पूर्व युरोपमधील पहिला देश आहे. युरोपमधील 74.6 टक्क्याच्या तुलनेत केवळ 56 टक्के प्रौढांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.
रोमानियाने पुन्हा एकदा रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे आणि आरोग्य पास अनिवार्य केले आहेत. कारण रोमानियामध्ये प्रति 1 लाख नागरिकांमध्ये रोज 20 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून ती सध्या जगातील सर्वाधिक आहे. रोमानियामधील केवळ 35.6 टक्के लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, बल्गेरियामध्ये नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्याच्या विरोधात लोकांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचा देश असलेल्या युक्रेनमध्ये पहिल्यांदाच महामारीच्या काळात कोरोनाचे सर्वाधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. येथे गुरुवारी, दररोज नवीन रुग्णांची संख्या 22,415 वर पोहोचली. युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल (ECDC) च्या मते, पूर्व युरोप आणि रशियामध्ये वाढत्या संसर्गाचे मुख्य कारण लसीकरणासाठी संकोच आहे. पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये, लसीकरण दर केवळ 24 टक्के नोंदवले गेले. त्यामुळे या देशांमध्ये मृत्यूच्या घटना वाढत आहेत.