विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटे दरम्यान ब्लॅक फंगस (काळी बुरशी) नंतर, आता व्हाइट फंगस (पांढरी बुरशी) या प्रकाराची शक्यता वाढल्याने रुग्णांवर मोठे संकट ओढावले आहे. तर आरोग्य प्रशासन आणि वैद्यकीय तज्ज्ञ यांच्यामध्ये चिंता व्यक्त होत आहे.
बनारस हिंदू विद्यापीठातील वैद्यकीय विज्ञान संस्था, न्यूरोलॉजी विभागातील डॉ. विजयनाथ मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे की, पांढऱ्या बुरशीला वैद्यकीय भाषेत कॅन्डिडा म्हणतात. या बुरशीमध्ये फुफ्फुसांसह रक्तप्रवाहात प्रवेश करण्याची क्षमता असते.
जेव्हा ती रक्तापर्यंत पोहोचते तेव्हा त्याला कॅन्डिडेमिया म्हणतात. पांढरी बुरशी अधिक धोकादायक आहे, कारण यामुळे शरीराच्या प्रत्येक भागावर वाईट परिणाम होतो. मात्र सर्वात जास्त नुकसान कोरोनामुळे फुफ्फुसांना होते. पांढरी बुरशी फुफ्फुसांवर हल्ला करते. कोरोना रूग्णांमध्ये त्याचा धोका वाढू शकतो.
डॉ. मिश्रा पुढे म्हणतात की, या बुरशीमुळे मेंदूत त्वचा, नखे, तोंडातील अंतर्गत भाग, पोट, मूत्रपिंड, आतडे आणि स्रावदेखील व्यापू शकतो. अवयव निकामी झाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. जे रुग्ण ऑक्सिजन किंवा बोट्युलेटरवर आहेत, त्यांची उपकरणे बॅक्टेरिया मुक्त असावेत, फुफ्फुसांमध्ये जाणारा ऑक्सिजन बुरशीपासून मुक्त असावा.
पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे विभागप्रमुख डॉ. सत्येंद्र नारायण सिंह म्हणतात की, पांढरी आणि काळी बुरशी ही नवीन नाही. पांढर्या बुरशीमुळे छातीत संसर्ग होण्याचा धोका वाढतो. असा प्रकार नवजात मुलामध्ये देखील होऊ शकते. ज्या रूग्णांचे रॅपिड अॅन्टीजेन आणि आरटी पीसीआर टेस्ट निगेटिव्ह असतात. त्यांची बुरशीची चाचणी देखील झाली पाहिजे.
काळ्या बुरशीपासून लक्षणे थोडी वेगळी आहेत. जर याचे संक्रमण सांध्यापर्यंत पोहोचले, तर आपल्याला सांधेदुखीच्या वेदना होऊन चालण्यात अडचण येईल. जेव्हा ही बुरशी मेंदूपर्यंत पोहोचते, तेव्हा त्या रुग्णांची विचार करण्याची क्षमता कमी होणे, डोकेदुखी किंवा अचानक आरोग्यावर परिणाम होतो.
त्वचेवर लहान आणि वेदनारहित गोल फोड येणे, असे संसर्ग एक ते दोन आठवड्यांत उद्भवू शकतात. पांढर्या बुरशीने फुफ्फुसाचा त्रास, खोकला, श्वास घेण्यात अडचण, छातीत दुखणे आणि ताप असा त्रास होऊ शकतो.