इंदूर (मध्य प्रदेश) – अयोध्या आणि काशी (वाराणसी) नंतर आता मथुरेतही श्रीकृष्णाचे भव्य मंदिर होईल, अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या मथुरा येथील खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी व्यक्त केली आहे. राम जन्मभूमी आणि काशीचा पुनर्विकास केल्यानंतर आता स्वाभाविकरित्या मथुराही खूपच महत्त्वाचे आहे, असे हेमा मालिनी म्हणाल्या. त्यामुळे या संदर्भात देशामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेमा मालिनी इंदूर येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. हेमा मालिनी सोमवारी आमंत्रणावरून वाराणसीला जाणार आहेत. त्या म्हणाल्या, की प्रेम आणि स्नेहच्या प्रतिक मानले जाणारे भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मभूमी असलेल्या मथुरेची खासदार असल्याच्या नात्याने तिथे एक भव्य मंदिर व्हावे. एक मंदिर आधीपासूनच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित केलेल्या काशी-विश्वनाथ कॉरीडोअरसारखेच या मंदिराला विकसित केले जाऊ शकते.
एक प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, अयोध्या आणि काशीनंतर मथुरासुद्धा आवश्यक आहे. आतापर्यंत न झालेला मथुरेचा उद्धार होणे आवश्यक आहे. मथुरेची खासदार म्हणून येथे एक भव्य मंदिर व्हावे अशी माझी इच्छा आहे. काशी विश्वनाथचे पुनरुत्थान आणि पुनर्विकास करणे खूपच कठीण काम होते. यातून पंतप्रधान मोदीजी यांचा दूरदर्शी स्वभाव दर्शवतो. मथुरेतही असेच होणार आहे. दरम्यान, हेमामालिनी यांच्या इच्छेनंतर मोदी भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा प्रश्न नक्कीच तडीस लावतील आणि भव्य कृष्ण मंदिर साकारले जाईल, अशा प्रतिक्रीया भाजप नेते व कार्यकर्त्यांकडून सोशल मिडीयावर व्यक्त होत आहेत.