इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एअर इंडिया या हवाई वाहतूक कंपनीची विक्री केल्यानंतर आता सरकार आयडीबीआय बँक विकण्याच्या तयारीत आहे. सरकारी व्यवस्थेने तशा हालचालीदेखील सुरु केल्या आहेत. केंद्र सरकार या बँकेतील हिस्सा विकण्यासाठी ओपन ऑफरचे आयोजन करणार आहे. म्हणजेच आयडीबीआय बँक स्टेक विकण्यासाठी खुली ऑफर सरकारी व्यवस्थेने ठेवली आहे. संसदेत ही माहिती देण्यात आली.
लोकसभेत एका लेखी उत्तरात वित्त राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले, “एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट जारी करण्यापूर्वी गुंतवणूकदारांच्या हिताचे मूल्यांकन करण्यासाठी रोड शो आयोजित केला जात आहे. सरकार पुढील महिन्यापर्यंत आयडीबीआय बँकेतील आपला हिस्सा विकण्यासाठी आदेश देऊ शकते. ” नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर आयडीबीआय बँकेचे शेअर्स ४.४३ टक्क्यांनी वाढून ४४.७५ रुपयांवर स्थिरावले आहेत. याविषयी जारी केलेल्या अहवालानुसार, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकार व्यवस्थापन नियंत्रणासह बँकेतील सुमारे २६ टक्के स्टेक विकण्याचा विचार करू शकते. त्यानंतर सरकार आपला संपूर्ण हिस्सा विकण्याचा विचार करेल. आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने गेल्या वर्षी मे महिन्यात आयडीबीआय बँकेतील धोरणात्मक निर्गुंतवणूक आणि व्यवस्थापन नियंत्रण हस्तांतरित करण्यास तत्वतः मान्यता दिली होती.
आयडीबीआय बँकेत सरकार आणि एलआयसीची ९४ टक्क्यांपेक्षा जास्त इक्विटी आहे. एलआयसीकडे ४९.२४ टक्के हिस्सेदारी आहे, तर सरकारची बँकेत ४५.४८ टक्के हिस्सेदारी आहे. नॉन-प्रमोटर शेअरहोल्डिंग ५.२९ टक्के आहे. आयडीबीआय बँक २१ जानेवारी २०१९पासून एलआयसीची उपकंपनी बनली होती. त्यापूर्वी एलआयसीने बँकेचे ८२ कोटी ७५ लाख ९० हजार ८८५ रुपयांचे अतिरिक्त शेअर्स खरेदी केले होते. त्यामुळे एलआयसीचा हिस्सा ५१ टक्क्यांपुढे गेला होता. नंतर मात्र, एलआयसीने आपला हिस्सा कमी केला होता.