नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एअर इंडियानंतर आता मोदी सरकार आणखी एक सरकारी कंपनी विक्री करण्याच्या तयारीत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील औषध निर्माता कंपनी एचएलएल लाइफकेअर लिमिटेड (HLL Lifecare Limited) या कंपनीची जबाबदारी खासगी कंपन्यांच्या हातात सोपोवली जाणार आहे. सरकारकडून एचएलएल लाइफकेअरमधील संपूर्ण भागीदारी विक्री केली जाणार आहे. धोरणात्मक निर्गुंतवणुकीअंतर्गत ही कंपनी आता खासगी हातात जाणार आहे.
लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, एचएलएल लाइफकेअर खरेदी करणाऱ्यांच्या यादीत देशातील प्रसिद्ध उद्योजक ग्रुप अदानी समुह (Adani Group) आणि पिरामल हेल्थकेअर (Piramal Healthcare) यांच्या नावांचा समावेश आहे. सरकारकडून लवकरच पिरामल ग्रुप, अदानी ग्रुप, अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आणि मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्यासह इतर बोली लावणाऱ्या कंपन्यांकडून एचएलएलसाठी बोली मागविण्यात येणार आहे.
एचएलएलच्या आर्थिक मूल्यांकनासाठी आर्थिक व्यवहार सल्लागारांची मदत घेतली जात आहे. आर्थिक बोली लावण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू असून, विजेत्याची निवड आर्थिक बोलींच्या आधारावर केली जाणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
आरोग्य क्षेत्रातील या सार्वजनिक उपक्रमामधील १०० टक्के भागीदारी विक्री करण्यासाठी १४ डिसेंबर रोजी सरकारकडून बोली मागविण्यात आली होती. ३१ जानेवारी ही ईओआय जमा करण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर मुदतवाढ देऊन २८ फेब्रुवारी आणि नंतर १४ मार्च मुदत देण्यात आली.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत एचएलएल लाइफकेअर हा उपक्रम चालवला जातो. हिंदुस्थान लॅटेक्स लिमिटेड (Hindustan Latex Limited) या नावाने कंपनीची स्थापना १ मार्च १९६६ रोजी करण्यात आली होती. कंपनीचा पहिला प्लांट १९६७ रोजी केरळमध्ये उभारण्यात आला होता. ५ एप्रिल १९६९ रोजी कंपनीचा जापानच्या Okamoto इंडस्ट्रिज या कंपनीशी करार झाला होता. २००९ मध्ये कंपनीचे एचएलएल लायफकेअर लिमिटेड असे नामकरण करण्यात आले.