नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून पायऊतार करायला भाग पाडणारे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाच महिन्यांनी समोरासमोर येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले असून रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये उतरलेले आहेत. त्यांनी सोमवारी रात्री ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक घेत विधानसभेतील रणनीती आखली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे विधानसभा कामकाजात भाग घेणार असल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे हे अद्याप विधान परिषदेचे सदस्य आहेत. शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याची घोषणा केलेली. परंतू, विधान परिषदेतील संख्याबळ आणि गणित पाहत त्यांनी हा राजीनामा खिशातच ठेवला होता. उद्धव ठाकरेंनी गेल्या वेळचे पावसाळी अधिवेशन मुंबईत असतानाही हजेरी लावली नव्हती. परंतू, आता विरोधी पक्षांची एकजूट केल्याने ठाकरेंना नागपुरात येणे रणनीतीच्या दृष्टीने भाग आहे. शिंदे सरकारविरोधात रणनिती बनविण्यात राष्ट्रवादी, काँग्रेसपेक्षा ठाकरे गट सक्रीय आहे. त्यांच्याकडे तसे कारणही आहे. यामुळे ठाकरेंनी सोमवारी रात्री आमदारांची बैठक घेतली आहे. ही बैठक सायंकाळी ६ वाजता सुरु झाली होती. या बैठकीनंतर ठाकरेंनी महाविकास आघाडीची आज सकाळी ९ वाजता एक महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीचे आयोजन विधानसभेतच करण्यात आले. यासाठी उद्धव ठाकरे विधानसभेत आले.
शिवसेनेचे कार्यालय राष्ट्रवादीच्या बाजूलाच..
हिवाळी अधिवेशनादरम्यान दरवेळी शिवसेनेचे कार्यालय भाजप कार्यालयाच्या बाजूला अर्थात विधानसभेच्या पायऱ्यांपुढे असते. मात्र, शिवसेनेच्या शिंदे गटाला हे कार्यालय मिळाले. कार्यालयातून उद्धव ठाकरे यांचा फोटो काढून त्या ठिकाणी आनंद दिघे यांचा फोटो लावण्याची तयारी सुरू झाली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या दोन्ही बाजूला पुष्पमाला घालण्यासाठी खिळे ठोकण्यात आले. याचवेळी विधिमंडळाच्या सभागृहाच्या दक्षिण द्वाराजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाजूला शिवसेनेच्या ठाकरे गटाला जागा देण्यात आली.
After 5 Months Uddhav Thackeray Eknath Shinde Amne Samne
Politics Shivsena Maharashtra Assembly Session Winter Nagpur