धनबाद (झारखंड) – असं म्हणतात की प्रेम आंधळं असतं. आणि प्रेमात सारे काही माफ असते. एखाद्या महिलेचे प्रियकरावर प्रेम असते. पण, त्याच्यासोबत लग्न नाही झाले तर स्वतःला नव्या संसारात रमवून घेते किंवा रमून जाते. मात्र, एक महिला चार मुले झाल्यानंतर म्हणजेच अनेक वर्षांनंतरही प्रियकरासोबत जाण्यासाठी इच्छुक असेल तर. असाच काहीसा प्रकार येथे घडला आहे.
गोविंदपूर जामडीहा पंचायतीच्या कुबरीतांड गावात रविवारी सायंकाळी विवाहित महिला आणि तरुण यांच्यातील प्रेमप्रकरणातून मोठी चकमक उडाली. ग्रामस्थांच्या जमावाने प्रियकर, प्रेयसी तसेच प्रियकराच्या पालकांवर हल्ला केला. या प्रकरणाचा गुंता सोडविण्यासाठी समाजाची पंचायत भरलेली असताना जमावाच्या रूपात आलेल्या काही ग्रामस्थांनी प्रियकर आणि त्याच्या वडिलांना बेदम मारहाण केली. कथित प्रेयसी ही चार मुलांची आई असून देखील ती आता पतीला सोडून प्रियकरसोबत राहू इच्छीते.
मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या दुर्घटनेत प्रियकर प्रेयसी सह चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच गोविंदपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी धनबादमध्ये दाखल झाले. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून डीएसपी अमर कुमार पांडेही जखमीच्या चौकशीसाठी रुग्णालयात पोहोचले. पोलीसांनी सांगितले की, गावातील नूर मोहम्मद यांचा मुलगा रमजान अन्सारी हा अविवाहित असून त्याच्या प्रेयसीचा नवरा हा तामिळनाडूमध्ये गवंडी म्हणून काम करतो.
रमजान आणि विवाहित महिलेच्या प्रेमाबाबत गावकऱ्यांना समजल्यावर आणि दोघेही गावातून पळून गेल्यावर त्यांचा खूप शोध घेतला. तेव्हा दोघेही पती-पत्नी म्हणून राहत असलेल्या नरोडीह गावातून शनिवारी सापडले. त्यानंतर रविवारी सायंकाळी समाजाच्या जामडीहा येथे भरलेल्या पंचायतीमध्ये बैठक झाली. यामध्ये गावातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. रमजानसोबत गेलेल्या चार मुलांची आई कोणासोबत राहायची याचा विचार बैठकीत होणार होता.
यावेळी पंचायतीमध्ये महिलेने प्रियकरसोबत राहत असल्याचे स्पष्टपणे सांगितले. तसेच पतीसोबत राहण्यास नकार दिला. तेव्हा याच बैठकी दरम्यान गावातील काही तरुणांनी या प्रेमी युगुलावर हल्ला केला. प्रियकर रमजान अन्सारी याला बेदम मारहाण करण्यात आली. तेव्हा बचावासाठी आलेल्या रमजानचे वडील आणि आई यांच्यावरही जमावाने हल्ला करून चौघांनाही जखमी केले. घटनेची माहिती मिळताच गोविंदपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हल्लेखोर पळून गेले.