मुंबई – लेखक, संगीतकार आणि गायक असलेले लकी अली सध्या त्यांच्या गाण्यामुळे चर्चेत आहेत. त्यांचे ‘ओ सनम’ हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय आहे. सार्वजनिक जीवनात चाहत्यांचे प्रेम मिळवणारे लकी अली हे वैयक्तिक जीवनात मात्र एकटेच आहेत. तीन लग्न करूनही आज त्यांच्या नशिबी एकटेपणा आला आहे.
१९ सप्टेंबर १९८५८ मध्ये लकी अली यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सुपरस्टार कॉमेडियन मेहमूद यांच्यासोबत त्यांचे संबंध फारसे चांगले नव्हते, असे बोलले जाते. १९९६ मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘सुनो’ रिलीज झाला. तो लोकांना फार आवडला. यात काम करणारी अभिनेत्री मेघन जेन मॅकक्लिअरी हिच्यासोबत त्यांचा पहिला विवाह झाला. त्यांना दोन मुलेही झाली. मात्र, काही वर्षांनी हे दोघे वेगळे झाले.
काही वर्ष एकटेपणात घालवल्यावर त्यांचे एक पर्शियन महिलेवर प्रेम जडले. तिच्याशी लग्न केले, पण कालांतराने तिच्यासोबत मन न रमल्याने तिलाही त्यांनी घटस्फोट दिला. त्यानंतर २०१० मध्ये लकी अली यांची भेट केट एलिझाबेथ या ब्रिटिश ब्युटी क्वीनशी झाली. त्यांनी लग्न केले. लग्नानंतर तिचे नाव बदलून आयेशा ठेवले. पण हे लग्न देखील टिकले नाही, आणि ते विभक्त झाले.
६२ वर्षीय लकी अली यांच्यासोबत त्यांची मुले रहात असली तरी त्यांना एकटेपणा जाणवतो. सध्या ते बंगळुरू येथे राहतात.